ठाण्यात टीबीचे रुग्ण ५० टक्क्यांनी घटले

कोरोना काळात तपासण्या आणि उपचार घेतल्याने रुग्णांच्या संख्येत घट

ठाणे : महापालिका क्षेत्रात टीबी रुग्णांच्या संख्येत तब्बल ५० टक्क्यांनी घट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना आणि टीबीची लक्षणे जवळपास समान असल्याने बहुतांश नागरिकांनी टीबीवर उपचार न घेता कोरोनावर उपचार घेतले खरे मात्र त्यानंतर त्यांना टीबी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

2020 आणि 21 मध्ये झालेल्या तपासणीत ठाणे पालिकेला टीबीचे 4,500 रुग्ण आढळले. 2020 च्या सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कमी रूग्ण रूग्णालयात पोहोचले असले तरी 2021 मध्ये अधिक दिलासा मिळाल्याने ठाणे महापालिकेने क्षयरोग रूग्णांच्या तपासणीत वाढ केली. या वर्षात आतापर्यंत ठाणे महापालिकेला जवळपास आठ हजार टीबीचे रुग्ण आढळले आहेत. त्यांची वेळीच तपासणी करून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांच्यावर उपचारही सुरू केले आहेत.

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात टीबीच्या संशयित रुग्णांच्या मोफत चाचण्या केल्या जातात. या चाचणीनुसार शहरात दरवर्षी सुमारे आठ हजार टीबीचे रुग्ण आढळून येत असल्याची माहिती समोर आली आहे .टीबी असल्याचे निष्पन्न झाल्यास अशा रुग्णांवर महापालिकेकडून मोफत उपचार केले जातात. ठाणे पालिका क्षेत्रात आढळलेल्या साडेचार हजार रुग्णांपैकी १ हजार ५३४ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.  कारण अशा रुग्णांमध्ये हा आजार तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्यात पोहोचला असून उपचार आणि औषधे देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

महापालिकेचे क्षयरोग अधिकारी डॉ.प्रसाद पाटील यांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारने 2025 पर्यंत देश टीबीमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.  याअंतर्गत ठाणे शहराने कोरोनाच्या काळातही टीबी रुग्ण शोधण्याची मोहीम सुरू ठेवली. याशिवाय उपचार अर्धवट सोडणाऱ्या रुग्णांचा शोध घेण्याची मोहीमही सुरु ठेवण्यात आली आहे. मुंबईत सध्या एक्सडीआर टीबी रुग्णांची संख्या १ हजार ५३५ आहे.  क्षय रुग्णांच्या उपचारासाठी सरकारकडून बीडीक्यू नावाची गोळी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. जी अधिक महाग आहे. त्याचा उपचार सहा महिने चालतो. या औषधाची किंमत प्रति रुग्ण दहा लाखांच्या आसपास आहे. मात्र, हा संपूर्ण खर्च महापालिका आरोग्य विभाग, केंद्र आणि राज्य सरकारमार्फत केला जातो.  खासगी लॅबमध्येही या रुग्णांची मोफत तपासणी केली जाते. केंद्र आणि राज्य सरकारकडूनही निधी दिला जातो. रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव, कॉमोरबिडीटी, म्हातारपण, शस्त्रक्रिया करणार्‍या रुग्णांना, चुकीचा आहार, योग्य झोप न लागल्यामुळे टीबीचा संसर्ग होऊ शकतो. नागरिकांचे योग्य निदान करून लक्षणे दिसल्यानंतर औषध घेतल्यास रुग्ण बरा होतो. लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करत महापालिकेच्या आरोग्य केंद्रांना आणि कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या क्षयरोग निदान केंद्रांना भेट देऊन योग्य उपचार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कोरोना आणि टीबीची समांतर लक्षणे

कोरोनाच्या काळात या टीबी रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.  गेल्या दोन वर्षांपासून शहरात जेमतेम साडेचार हजार रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या पन्नास टक्क्यांनी घटल्याचे समोर आले आहे.  कोरोना आणि टीबीच्या समान लक्षणांमुळे अनेक रुग्ण गोंधळून गेले होते आणि ते प्रथम कोरोनावर उपचार करताना दिसले. पण नंतर त्यांना टीबी असल्याचे समोर आले. डॉ.पाटील यांच्या म्हणण्यानुसार टीबीची लक्षणेही कोरोनासारखीच असून यामध्येही रुग्णाला ताप, थंडी वाजून येणे, थकवा जाणवणे, खोकला, वजन कमी होणे आदी लक्षणे दिसतात.

फुफ्फुसांना सर्वाधिक त्रास होतो

क्षयरोग हा जीवाणूंमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे.  या आजाराचा सर्वात मोठा परिणाम फुफ्फुसावर होतो. फुफ्फुसाशिवाय मेंदू, गर्भाशय, तोंड, यकृत, किडनी, घसा इत्यादी ठिकाणीही टीबी होऊ शकतो. फुफ्फुसाचा टीबी सर्वात सामान्य आहे, जो हवेद्वारे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. टीबी रुग्णाच्या खोकताना आणि शिंकताना तोंडातून आणि नाकातून बारीक थेंब बाहेर पडतात.  फुफ्फुसाशिवाय, इतर कोणताही क्षयरोग एकातून दुसऱ्यामध्ये पसरत नाही. क्षयरोग हा धोकादायक असतो कारण शरीराच्या ज्या भागात तो होतो, त्यावर योग्य उपचार न केल्यास शरीरातील तो भाग  निरुपयोगी होतो. त्यामुळे क्षयरोगाची शक्यता असल्यास चाचणी करून घ्यावी.

रुग्णांची आकडेवारी

एका वर्षात आढळलेल्या रुग्णांची संख्या – 4500
चिंता म्हणजे गंभीर रुग्णांची संख्या – 1535
बरे झालेल्या रुग्णांची संख्या – 960
मृत रुग्णांची संख्या – 68
इतर राज्यात गेलेल्या रुग्णांची संख्या – २६
क्षयरोगाचे औषध सोडलेल्या रुग्णांची संख्या – 30
टीबीवर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या – 336
टीबीवर उपचार करूनही प्रतिसाद न देणाऱ्या रुग्णांची संख्या – 115