ठाणे मतदारसंघात २६२ वृद्धांनी तर ३८ दिव्यांगांनी केले घरातूनच मतदान

ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघातील ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगाच्या गृहमतदानाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. ठाणे लोकसभा मतदार संघातून ८५ वर्षांवरील २६२ तर ३८ दिव्यांग मतदारांनी आपला गृह मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांनी घरी जाऊन बॅलेट पेपरवर या सर्व मतदारांचे मतदान करून घेण्यात आले आहे.

निवडणुकीत प्रत्येक मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक विभाग प्रयत्नशील आहे. मात्र वयोवृद्ध आणि दिव्यांगांना मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणे शक्य नाही अशा मतदारांसाठी घरातून मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या मतदार यादीमध्ये ठाणे लोकसभा मतदार संघात ८५ वर्षावरील २३ हजार ६९२, तर १५ हजार ८५ दिव्यांग मतदार आहेत. मतदार यादीत एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांची संख्या असली तरी प्रत्यक्षात ८५ वर्षावरील २६२ तर ३८ दिव्यांगांनी गुरुवारी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मतदार यादीमधील मतदारांच्या तुलनेत झालेले मतदान फारसे समाधान कारक नसले तरी मतदान करणाऱ्यांची संख्या वाढेल असा विश्वास निवडणूक विभागाने व्यक्त केला आहे.

दिव्यांग आणि ८५ वर्षावरील मतदारांना घरून मतदान करता यावे यासाठी त्यांच्या नोंदणीसाठी बीएलओने प्रत्येक दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून सहमती घेण्यासाठी फॉर्म नं १२ ड भरून घेतला होता. त्यानंतर गुरवारपासून प्रत्यक्षात गृह मतदानाला सुरुवात करण्यात आली असून निवडणूक कर्मचाऱ्यांनी घरी जाऊन बॅलेट पेपरवर या सर्वांचे मतदान करून घेतले आहे.

विधानसभानिहाय झालेले मतदान

विधानसभा ८५ वर्षावरील दिव्यांग
मीरा-भाईंदर ३४ ३
ओवळा-माजिवडा ४६ १६
कोपरी-पाचपाखाडी २२ ४
ठाणे १०३ २
ऐरोली १८ ४
बेलापूर ३९ ९