ठाण्यात दहा वर्षांत पाण्याचा पुनर्वापर १६ टक्क्यांवर नेणार!

प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर आराखड्याचे प्रकाशन

ठाणे: सध्या ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज २४१ दशलक्षलीटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यापैकी केवळ पाच टक्के पाण्याचा पुनर्वापर होतो. २०३५पर्यंत हा वापर किमान १६ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

उष्णता कृती आराखडा, नागरी पूर व्यवस्थापन नियोजन, हवा गुणवत्ता व्यवस्थापन या तीन आराखड्यानंतर आता पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेसाठी कौन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर (सी ई ई डब्ल्यू) यांनी महापालिकेच्या सर्व विभागांशी संवाद साधून, क्षेत्र भेटी देऊन हा आराखडा तयार केला आहे. त्याचे प्रकाशन गुरूवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

शाश्वत नागरी विकासासाठी पाण्याचा पुनर्वापर करण्याचे नियोजन करून जल व्यवस्थापनाच्या क्षेत्रात ठाणे महानगरपालिकेने अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या आराखड्याची अंमलबजावणी कालबद्ध रीतीने करण्यात येणार आहे. वाढत्या नागरीकरणामुळे पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा लागणार असल्याचे प्रतिपादन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

सध्या ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज २४१ दशलक्षलीटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यापैकी केवळ ५ टक्के पाण्याचा पुनर्वापर होतो. २०३५पर्यंत हा वापर किमान १६ टक्क्यांपर्यत वाढवण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. तोवर ४९० दशलक्षलीटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुनर्वापर योग्य करण्याची क्षमता निर्माण होईल. या आराखड्यातून प्रक्रिया क्षमता वाढवणे, जास्तीत जास्त पाण्याचा पुनर्वापर करणे, उद्यान, शौचालये, उद्योग, बांधकाम यासाठी या पाण्याचा वापर वाढवून पिण्याच्या पाण्यावरील अवलंबित्व कमी करण्याचे नियोजन असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

त्याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, एडीटीपी संग्राम कानडे, उपायुक्त मनोहर बोडके, टीएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके, उप नगर अभियंता विकास ढोले, विनोद पवार, गुणवंत झांबरे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, उद्यान अधिकारी केदार पाटील, ‘सीईईडब्ल्यू’चे विश्वास चितळे, नितीन बस्सी, साबिया गुप्ता, कार्तिकेय चतुर्वेदी, आयुषी कश्यप आदी उपस्थित होते.

सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर उपयोजनांकरता वापरण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष्ये निर्धारित केली आहेत. जलवाहिन्यांच्या अमृत योजनेसाठीही या निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘सीईईडब्ल्यू’ने केलेला हा आराखडा ठाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. देशात अनेक ठिकाणी पाण्याचा पुनर्वापर योजना असल्या तरी याप्रमाणे त्याचा नियोजनबद्ध आराखडा तयार करणारी पहिली महापालिका ठाणे असेल, असेही आयुक्त राव यांनी सांगितले. ठाण्यातील वाढती लोकसंख्या, नागरीकरण यामुळे पाण्याच्या जास्तीत जास्त पुनर्वापराचा विचार महापालिकेस करावाच लागेल, असेही राव याप्रसंगी म्हणाले.

‘सीईईडब्ल्यू’ संस्थेने गेल्या सात महिन्यात महापालिकेच्या विविध विभागांशी संवाद साधून हा आराखडा तयार केला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची पाहणी, पाण्याच्या पुनर्वापरासाठी उपलब्ध असलेल्या संधी यांचा अभ्यास करून हा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली.

उद्यान, अग्निशमन सेवा, बस डेपो, रस्ते धुणे, बांधकाम, शौचालय येथे प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर शक्य आहे. तसेच, भूजल वाढवण्यासाठीही या पाण्याचा उपयोग होऊ शकतो. त्यासाठी ठाणे महापालिकेने कशापद्धतीने कमी, मध्यम आणि दीर्घकालीन नियोजन करावे, याची मांडणी या आराखड्यात करण्यात आली आहे. २०४६पर्यंत ठाणे महापालिकेची सांडपाणी प्रक्रियेची दैनंदिन क्षमता ११९५ दशलक्ष लीटर होईल. तर, दैनंदिन स्वरुपात ९७९ दशलक्षलीटर पाण्यावर प्रक्रिया केली जाईल. या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून त्यातून महापालिकेस शुल्कही मिळू शकेल, असे या ‘सीईईडब्ल्यू’चे नितीन बस्सी यांनी स्पष्ट केले.