शिवगंगानगरमध्ये ‘रात्रीस खेळ चाले’…

लिंबू-दोरे पाहून नागरिकांत घबराट

अंबरनाथ: अंबरनाथच्या पूर्वेकडील शिवगंगानगरसारख्या गजबजलेल्या परिसरात बुधवार 8 मे च्या चैत्र अमावस्येच्या रात्री 9 च्या सुमारास एका सुपामध्ये लिंबू, दोरे , दिवे अशा वस्तू ठेवून एक व्यक्ती पसार झाली. रस्त्यात ठेवलेल्या वस्तू पाहून नागरिकांमध्ये घबराट पसरली. सर्व प्रकार सीसी कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत आहे.

असे कृत्य झाल्याची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी अविनाश सुरसे यांनी सगळ्या वस्तू जागेवरून उचलून नेल्या आणि वाहत्या पाण्यात सोडून दिल्या. आणि नागरिकांच्या मनातील संभ्रमवस्था दूर केली.

रस्त्याच्या मध्यभागी ठेवलेल्या वस्तू नागरिकांच्या दृष्टीला पडल्या आणि नागरिक जमा झाले आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली. काही जण घाबरून दूर पळू लागले होते. त्याचवेळी संबंधित ठिकाणी आलेल्या वाहन चालकांनी देखील सावधगिरी बाळगत सुपाच्या बाजूने वाहने वळवली.

हा अनोखा प्रकार स्थानिक रहिवासी आणि कल्याणच्या शाळेतील शिक्षक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सचिव अविनाश सुरसे यांना समजताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. ठेवलेल्या सर्व वस्तूंसह सूप संबंधित ठिकाणावरून उचलले आणि वाहत्या पाण्यात सोडून दिल्याचे सांगितले. सुशिक्षित आणि पुढारलेल्या राज्यात आजही असे प्रकार घडतात, हे प्रकार अयोग्य आहे. त्याचा निषेध व्यक्त करून सुपातील सर्व वस्तू विसर्जित केल्याचे श्री. सुरसे म्हणाले.