उद्धव ठाकरेंच्या आदेशाला केराची टोपली
शहापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ नुसार १३५ -शहापूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघाची छानणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ११ पैकी दोन उमेदवारांनी आपले नामनिर्देशन मागे घेतले. अपक्ष म्हणून अर्ज भरलेले व माघार घेतलेले ज्ञानेश्वर तळपाडे व राजेंद्र म्हसकर हे दोघे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे
शिवसेनेचे पदाधिकारी आहेत.
दरम्यान महाविकास आघाडीत बंडखोरी करून शिवसेना उबाठा गटाचे अविनाश शिंगे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम करुन अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये जिल्हा पदाधिकारी व तालुका पातळीवरील पदाधिकारी यांचे पाठबळ मिळाल्यामुळे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.
शहापूर विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतून पांडुरंग बरोरा, महायुतीचे दौलत दरोडा, मनसेचे हॅरी खंडवी, बहुजन समाज पार्टीचे यशवंत वाख, अपक्ष उमेदवार अविनाश शिंगे, रंजना उघडा, गणेश निरगुडे, गौरव राजे, रमा शेंडे ऊर्फ रुपाली आरज हे नऊ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
दरम्यान विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर महायुती आणि महाविकास आघाडीतील नव्या बंडखोरांमुळे डोकेदुखी वाढली असून निवडणूक लढणारच असा निर्धार या बंडखोरांनी केल्याने त्यांची समजूत तरी कशी काढायची याचा पेच राजकीय पक्षांच्या नेत्यांना पडला होता.