गेले अतिक्रमण काढण्याच्या बंदोबस्ताला, हाती लागला गांजा

नवी मुंबई: कोपर खैरणे येथील बालाजी थिएटरसमोरील झोपड्यांवर मनपातर्फे तोडक कारवाई हाती घेण्यात आली होती. या कारवाईदरम्यान पोलिसांना १५ किलो गांजा सापडला आहे. याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले असून तीन जण पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.

मागील अठवड्यात याच झोपडपट्टीतून कोपरखैरणे पोलिसांनी २० किलो गांजा हस्तगत केला होता. त्यामुळे नवी मुंबईतील झोपपट्ट्या या आता अंमली पदार्थ विक्रीचे अड्डे बनत चालल्याचे कारवाईतून दिसून येते.

नवी मुंबईतील कोपरखैरणे स्टेशन नजीक बालाजी थिएटर समोर बुधवारी नवी मुंबई मनपा अतिक्रमण विरोधी कारवाई करीत ३० पेक्षा अधिक झोपड्या काढून टाकल्या. या कारवाईत होणारा विरोध लक्षात घेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता. मात्र मनपाची कारवाई सुरू असतानाच एका ठिकाणी झोपडी पाडू नये म्हणून एक व्यक्ती कमालीचा विरोध करत होती. पोलिसांनीही त्या व्यक्तिला समजावून सांगितले. मात्र त्याचा विरोध प्रखर होताना पाहून पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी या झोपडीची झाडाझडती घेतली असता त्यात चक्क १३ किलो गांज्याच्या पिशव्या सापडल्या, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली आहे. याच झोपडपट्टीमधून मागील आठवड्यात तब्बल २० किलो गांजा पोलिसांनी हस्तगत केला होता.