नवी मुंबईत नोव्हेंबरमध्ये डेंग्यूसदृश तापाच्या रुग्णांचे प्रमाण घटले

नवी मुंबई : जुलै ते ऑक्टोबर असे सलग चार महिने नवी मुंबई शहरात डेंग्यू आजाराने डोके वर काढलेले असताना नोव्हेंबरमध्ये हा आजार नियंत्रणात आला आहे. नोव्हेंबरमध्ये शहरात ५३ डेंग्यूसदृश रुग्ण आढळले असून अधिकृत डेंग्यूची एकही नोंद नाही.

पावसाळा सुरू होताच हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत असतो. त्यामुळे वातावरणातील सततच्या बदलामुळे संसर्ग पसरवणाऱ्या जंतूंना अधिक पोषक हवामान निर्मिती होत असते. त्यामुळे रोग प्रसार करणाऱ्या जंतूंची प्रतिकार शक्ती वाढून त्यांची झपाट्याने वाढ होत असते. त्यामुळे या दिवसात साथीचे आजार डोके वर काढत असल्याने पालिका तसेच खाजगी रुग्णालयात तापाने बेजार झालेल्या रुग्णांची रीघ लागलेली पहावयास मिळत आहे.

ताप, सर्दी,खोकल्याने जडलेल्या रुग्णांसह मलेरिया व डेंग्यूचे रुग्ण अधिक असतात. जुलै २०२४ ते ऑक्टोबर २०२४ असे चार महिने नवी मुंबईत मलेरिया आणि डेंग्यूसदृश रुग्ण अधिक आढळून आले आहेत. यात ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक मलेरियाचे १७, डेंग्यू सदृश ३४३ तर अधिकृत डेंग्यू पाच असे कसर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. या चार महिन्यात एकूण ७६,६१७ जणांची रक्त चाचणी केली असता त्यात मलेरियाचे ५०, डेंग्यूसदृश १०६७ रुग्ण तर १२ जणांना अधिकृत डेंग्यूची लागण झालेली होती. मात्र नोव्हेंबरमध्ये ही सरासरी संख्या घटली आहे. नोव्हेंबरमध्ये १५४०८ जणांची रक्त चाचणी केली असता त्यात मलेरियाचे ९ व डेंग्यूसदृश ५३ रुग्ण दिसून आले असून एकही अधिकृत डेंग्यू रुग्ण आढळला नाही. आतापर्यंत शहरात जानेवारी ते नोव्हेंबर या दरम्यान एक लाख ५२,६०३ जणांची रक्त चाचणी करण्यात आली असून त्यात ७९ मलेरिया रुग्ण, १२९१ डेंग्यूसदृश व १६ जणांना अधिकृत डेंग्यूची लागण झाल्याचे मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारी वरूनस्पष्ट होत आहे.

महिना. रक्त चाचणी, मलेरिया , डेंग्यूसदृश डेंग्यू

जानेवारी ९३२५. ०३. २८. ००

फेब्रुवारी. १२०३५. ००. १८. ०२

मार्च. ९९७३. ०४. २२. ००

एप्रिल. ९०८१. ०८. १३. ०१

मे. ७६६२. ०३. २३. ००

जून. १२५०२. ०२. ६७. ०१

जुलै. १८६५४. ११. २०८. ०५

ऑगस्ट. २२७७६. १७. ३४३. ०५

सप्टेंबर. १९९७६. १०. ३१७. ०२

ऑक्टोबर. १५२११. १२. १९८. ००

नोव्हेंबर. १५४०८. ०९. ५३. ००
————————————————————————
१५२६०३. ७९. १२९१. १६