कल्याणमध्ये नागरिकांचा रास्ता रोको
कल्याण : कल्याणमध्ये भरधाव डंपरने मायलेकांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात माय लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
कल्याण पश्चिमेतील आग्रा रोड येथे श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर चौकामध्ये हा अपघात घडला आहे. बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडलेल्या या अपघातात ठाणकरपाडा श्री समर्थ अष्टविनायक चाळीत भाड्याने राहणाऱ्या निशा सोमेस्कर (35) आणि तीन वर्षाचा चिमुकला अंश सोमेस्कर या दोघांचा जागीच मृत्यू झाला. नर्सरी शाळेतून घरी जात असताना रस्ता क्रॉसिंगच्या वेळी डंपरने त्यांना उडवले.
कल्याण डोंबिवली महापालिकेचा डेबरीज उचलणाऱ्या डंपरने हा अपघात केला असून डंपरच्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर महापालिकेने येथील दुभाजक काढल्याने हा अपघात घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
हा अपघात झाला तेव्हा निशा यांचे पती अमित सोमेस्कर हे कामानिमित बंगलोर येथे गेले होते. अपघाताची माहिती मिळताच ते तातडीने कल्याणच्या दिशेने निघाले. या घटनेमुळे ठाणकर पाडा परिसरात चाळीतील नागरिक आणि नातेवाईक यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून रुक्मिणीबाई रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज चौक, सहाजानंद चौक, गुरूदेव हाँटेल चौक, लाल चौकी चौक आदी परिसरातील सिग्नल यंत्रणेसह झेब्रा क्रॉसिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज देखील कल्याण डोंबिवली शहरात स्टेशन परिसरात सॅटिसचे काम, तर बहुतांश मुख्य रस्त्यावर सुरु असलेले मेट्रोचे काम आणि समन्वयाचा अभाव यामुळे आणि मुख्य रस्त्यावर दिवसा धावणारी अवजड वाहनेदेखील अपघाताला कारणीभूत ठरत असल्याची ओरड सर्वसामान्य यानिमित्ताने करीत आहेत. तर या घटनेनंतर मनसे, भाजपा, शिवसेना शिंदे गट या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी रस्त्यावर रास्तारोको करीत केडीएमसी प्रशासन आणि वाहतूक विभागाचा निषेध नोंदवला.