किणीकर की वानखेडे याचा फैसला उद्या
अंबरनाथ : अखेर अंबरनाथ विधानसभा मतदार संघामध्ये 48.50 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी सहा टक्के मतदान वाढल्याचे उपलब्ध मतांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात बुधवारी सकाळपासून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. मतदारसंघात सतत तीन वेळा निवडून आलेले महायुतीचे शिवसेना उमेदवार विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि महाविकास आघाडीर्फे उबाठा गटाचे राजेश वानखेडे यांच्यासह 20 अन्य उमेदवार निवडणूक लढवत होते. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अंबरनाथ मतदार संघात तीन लाख 74,665 मतदारांची नोंद झाली होती. सरासरी 42 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती. त्यावेळी डॉ. किणीकर यांना 60,085 मते प्राप्त करून त्यांनी हॅट्ट्रिक केली होती.
मे 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात एक लाख 66,400 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना 93,670 तर प्रतिस्पर्धी उबाठा गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना 58 हजारांच्या आसपास मते मिळाली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी 47.07 टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सहा टक्क्याने वाढ होऊन 48.50 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. डॉ. किणीकर यांना स्वपक्षीयातील झालेल्या विरोधामुळे आणि उबाठा गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्यामुळे मिळणारा विजय संघर्षमय झाल्याचे पहायला मिळाले. यंदा थोड्याफार प्रमाणात वाढलेल्या मतांचा टक्का यामुळे डॉ. किणीकर यांना संधी मिळणार की वानखेडे यांची वर्णी लागणार हे शनिवारी समजेल.