ठाणे : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दुर्गम भागात अजूनही जाण्यासाठी रस्ते नाहीत, पायवाटांच्या मार्गाने तेथील नागरिक शहराकडे येतात. तर डोंगरावर वसलेल्या वस्त्या, परिसरात आरोग्य सुविधांचा अभाव असल्यामुळे आजही ठाण्यातील ३४७ गावांमध्ये ५४४ दाई माँ घरीच प्रसूती करत असल्याचे वास्तव समोर आले आहे. सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र असो किंवा वाड्या वस्त्यांमध्ये उपकेंद्राच्या माध्यमातून रूग्णालयात प्रसूती करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी अजूनही ते तितके यशस्वी ठरत नसल्याचे यावरून अधोरेखित होत आहे.
गर्भधारणा झाली की आरोग्य केंद्रात नाव नोंदणी करण्याचा सल्ला दिला जातो. पण वाड्या वस्त्या, आदिवासी भागापर्यंत हा सल्ला पोहचला पाहिजे आणि पोहचला तरी तिथल्या आरोग्य केंद्रांमधील सुविधा तुटपुंज्या, तिथे मिळणारी वागणूक, बाहेरून विकत आणायला सांगितल्या जाणाऱ्या औषधांची यादी यामुळे घरातच प्रसूती करण्याची मानसिकता काही लोकांची अजूनही आहे. तर काही लोकांची मानसिकता बदलली असली तरी आदिवासी भागात वेळेत वाहनाची सोय, आरोग्य केंद्रातील यंत्रणा, यातून गर्भवतीला होणारा प्रवासाचा त्रास या साऱ्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती जैसे थे अशीच आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूती होण्यासाठी जिल्हा परिषद भर देत आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन योजनांची माहिती दिली जाते. गेल्या काही वर्षात तसेच करोना काळात प्रसूती घरीच झाल्याची नोंद आरोग्य विभाग एकीकडे दाखवते. तर जिल्हा परिषदेकडे आदिवासी परिसरात प्रसूतीसाठी ३४७ गावांसाठी ५४४ दाई माँ असल्याची नोंद आहे.
तुटपुंजे मानधन
या दाईंना पूर्वी एका प्रसूतीसाठी जिल्हा परिषदेकडून १०० रूपये दिले जात होते. सध्या ते बंद करण्यात आले आहे. प्रसूती संदर्भात आयोजित केलेल्या महिन्यातील चार बैठकीला उपस्थित राहण्याचे मानधन केवळ दोन रूपये तिच्या हातावर टिकवले जात आहे. तर एकीकडे स्वच्छतेच्या बाबतीत असो किंवा माता व बालमृत्यू प्रमाण कमी करण्याचे धडे या दाईंना दिले जात असले तरी त्यादृष्टीने आवश्यक ती साधनसामुग्री मात्र पुरविली जात नाही.