* क्लस्टर योजनेतील पुनर्वसन इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
* टीकेचे फलक लावणाऱ्या राष्ट्रवादीवर हल्लाबोल
ठाणे : विरोधकांवर टीका करायची नाही, त्यांना कामाच्या माध्यमातून उत्तर द्यायचे आहे. इमारत झाल्यावर त्यांना नारळ फोडायला बोलवू, असा टोला ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीला लगावला.
ठाण्यातील लोकमान्यनगर येथील कोरस रस्त्यालगतच्या सुविधा भूखंडावर शहरातील समूह विकास योजनेंतर्गत पुनर्वसन इमारत उभारण्यात येणार असून या बांधकामाचे भूमीपूजन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. क्लस्टर राज्यातील नव्हे तर देशातील मोठी योजना ठरणार आहे. या योजनेत नागरिकांना घरासोबतच उद्यान आणि इतर सोयीसुविधा मिळणार आहेत. दर पावसाळ्यात मृत्यूच्या मालिका सुरू होत्या. लोकांची जबाबदारी ओळखून काम करण्याची सरकारची जबाबदारी होते. क्लस्टरसाठी सभागृहात आणि रस्त्यावर लढा दिला. आमदारकी गेली तरी बेहत्तर, पण क्लस्टर मंजूर करा अशी भूमिका घेतली. त्यामुळे योजना मंजूर केली. त्यातील काही त्रुटी नगरविकासमंत्री झाल्यानंतर दूर केल्या, असे त्यांनी सांगितले. अनधिकृत आणि अधिकृत इमारतीत राहणाऱ्या नागरिकांचे जीव सारखेच असतात. त्यामुळे अनधिकृत इमारतीमधील रहिवाशांसाठी क्लस्टर योजना महत्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.
क्लस्टर म्हणजे सोपे नाही. अनेक अडचणींवर मात करत क्लस्टरचा हा टप्पा पार केला आहे. सिडकोकडे नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान असून त्यातून ते उत्तम दर्जाचे घर बांधतात. त्यामुळे पालिकेने लवकर मोकळे भूखंड करून दिले तर त्याठिकाणी क्लस्टर योजनेतील इमारत बांधण्याचे काम करणे शक्य होईल, असेही ते म्हणाले. क्लस्टर योजना हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. या योजनेत नागरिकांना हक्काचे घर देईन, तेव्हाच मला आनंद मिळेल, एमएमआरडीए क्षेत्रात लाखो लोक अनधिकृत इमारतीत राहतात, त्यांना या योजनेतून दिलासा देता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. दिवा भागाचा या योजनेत समावेश करण्याची सूचना त्यांनी पालिकेला केली. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मोठे प्रकल्प हाती घेतले असून शहरासाठी काळू धरणाच्या कामाला सुरुवात केली आहे, असेही ते म्हणाले.
महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी सांगितले, ‘पालिकेने 45 पुनर्निर्माण आराखडे तयार केले असून त्यातील सहा आराखड्यांना मंजूरी मिळाली आहे. क्लस्टरला अनुकूल आणि प्रोत्साहन देणारी योजना तयार केली आहे. या योजनेसाठी कोरस रस्त्यालगतच्या सुविधा भूखंडावर शहरातील समूह विकास योजनेंतर्गत पुनर्वसन इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीत तीनशे चौरस फुटाच्या एकूण 243 सदनिका असणार आहेत. ही इमारत लवकरच बांधून त्यात किसननगर भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात येणार असून त्यानंतर किसननगर भागात सिडकोच्या माध्यमातून क्लस्टर योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पुनर्वसन इमारत उभारणीच्या निमित्ताने शहरात क्लस्टर योजनेच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे.
महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले, आज खऱ्या अर्थाने क्लस्टरच्या कामाचे भूमिपूजन झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी क्लस्टरसाठी लढा दिला आणि तो यशस्वी केला. शिवसेना जो शब्द देते, तो पाळते. त्यामुळे शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला आहे. शिवसेनेची पालिकेत पुन्हा एकदा एकहाती सत्ता आणू
क्लस्टर योजनेचे गाजर असे फलक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका मुख्यालयासमोर लावले होते. त्याचा समाचार महापौर म्हस्के यांनी घेतला. समाजात लायकी नाही, सोसायटीचा अध्यक्ष होऊ शकत नाही, असे लोक बॅनर लावून टीका करतात. त्यांच्या टीकेला आम्ही भीक घालत नाही, अशी टीका त्यांनी भाषणात केली. शिंदे यांना आपला मतदार संघ सोडून निवडून येईल अशा सोयीच्या संघात निवडणूक लढवावी लागली नाही, असा टोला त्यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना नाव न घेता लगावला.