ठामपा आयुक्तांचे आदेश
ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी आज सकाळी जांभळी नाका, मुख्य मार्केट परिसरातील स्वच्छतेसह ड्रेनेज, रस्ते दुरुस्ती गटर्स कामांची पाहणी करून शहरातील महापालिकेच्या आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणे, पार्किंग गाड्या तत्काळ हटविण्याचे आदेश संबंधितांना दिले.
महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आज कोर्ट नाका येथून स्वच्छता कामांची पाहणी करण्यास सुरुवात केली. या पाहणी दौऱ्यास माजी उप महापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, पवन कदम, अतिरिक्त आयुक्त(१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त मनीष जोशी, उप आयुक्त शंकर पाटोळे, उप आयुक्त अनघा कदम, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे संबंधित कार्यकारी अभियंता, उप अभियंता तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी पेढ्या मारुती मंदिर ते घड्याळ टॉवरपर्यंत नाला बांधणे, पेढ्या मारुती गणपती मंदिरसमोरील नाला मोठ्या प्रमाणावर मातीने भरला असल्यामुळे नाला स्वच्छ करण्याची कार्यवाही तातडीची सुरु करण्याचे आदेश देतानाच या परिसरात असलेले रिकामे विद्युत खांब निष्कासित करण्याचे आदेशही महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी दिले.
मार्केट परिसरातील भूमिगत ड्रेनेज लाईनमधील अडथळे दूर करणे, सरस्वती अपार्टमेंट ते वैभव ट्रेडिंग रस्त्याचे पुनर्पुष्टीकरण करणे, महात्मा फुले मंडई बाहेरील सर्व अतिक्रमणे निष्कासित करुन विहीत कार्यपध्दतीने मंडई अंतर्गत ओटयांमध्ये पुनर्वसन करणे तसेच नियमित साफसफाई ठेवणे, पंडीत जवाहरलाल नेहरु बाल उद्यानामध्ये किरकोळ दुरुस्ती व लँडस्केपिंग तसेच उद्यानासमोरील पार्किंगचे आरक्षण भूखंड विकसित करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबधितांना दिल्या.
नागसेन नगरमधील पाच ते सहा गल्ल्यांमध्ये टाईल्स बसविणे, शौचालय दुरुस्ती करणे, कामगार वसाहत ते मुख्य रस्त्यापर्यंत ड्रेनेज लाईन टाकणे, खारटन रोड लगत दोन शौचालयांमध्ये लाईट मिटर बसविणे, पार्किंगकरीता आरक्षित भुखंडाची धोकादायक कंपाऊंड वॉल बांधणे तसेच भूखंडामध्ये नियमितपणे दुरुस्तीचे कामकाज करून दिनांक १५ मे पर्यंत कार्यशाळा विभागाकडील कार्यालय सदर ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी खारटन रोड परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेली घरे, तळ अधिक एक मजली धोकादायक इमारतीमधील ३० भोगवटादार तसेच लफाट चाळीतील ६० अधिकृत भोगवटादारांचे सदर परिसरात सुरु असलेल्या झोपडपट्टी विकास योजने अंतर्गत पुनर्वसन करणेकामी आवश्यक उपाययोजना करणे तसेच लफाट चाळीतीलउर्वरीत सुमारे ६० अनधिकृत भोगवटादारांविरुध्द विहीत कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
ठाणा कॉलेज लगत उद्यानाचे आवश्यक लँडस्केपिंग करणे, झाडांच्या फांद्याची छाटणी करणे, उद्यानांमध्ये थीम पेंटींग करणे तसेच खारटन रोड परिसरातील महापालिकेच्या भूखंडावर तसेच कदम कंपाऊंडमधील आरक्षणे विकसित करणे यासोबतच सिडको बस स्टॉप समोरील नाल्याची भिंत बांधणे व नाल्यावरील अतिक्रमणे निष्कासित करण्याचे आदेशही महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबधितांना दिले.
दरम्यान ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेत नव्याने दाखल होणाऱ्या इलेट्रीक बसेसच्या बॅटरीबॅकअपची प्राथमिक चाचणी सुरु असून आज महापालिका आयुक्त डॉ.शर्मा यांनी सर्व अधिकाऱ्यांसमवेत या बसमधून प्रवास केला.