ठामपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तत्काळ लागू करा

कामगार नेते रवी राव यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

ठाणे : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग तातडीने लागू करावा, कळवा हॉस्पिटल येथे परिचारिकांची भरती व रिक्त असलेली सर्व पदे तातडीने भरण्यात यावी आदींसह इतर महत्वाच्या विषयांबाबत गुरुवारी म्युनिसपल लेबर युनियनचे अध्यक्ष रवी राव यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेतली.

महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही करण्यात आलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे मत यावेळी राव यांनी व्यक्त केले. परंतु पालिका कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी ही आधीच अधिकची असल्याने पालिका ही सातवा वेतन आयोग लागू करत नसल्याचे दिसून आले आहे. ७ व्या वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांच्या भांवना तीव्र आहेत. कामगारांनी लढे देऊन मिळवलेली वेतश्रेणी कमी करण्यास कामगारांचा विरोध असून वेतन कपात ते कधीही मान्य करणार नाहीत. त्यामुळे नगर विकास विभागाचे अधिकारी तसेच महापालिका प्रतिनिधी व यूनियन प्रतिनिधींची सयुक्त बैठक घेऊन यावर निर्णय घेण्याची मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार यावर तोडगा काढण्याची विनंती त्यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात परिचारिकांची संख्या अत्यंत कमी असल्याने सध्या कार्यरत असलेल्या एका परिचारिकेला सुमारे चार परीचारिकांचे काम करावे लागते. त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. त्यामुळे परिचारिकांची पदे तातडीने भरण्याची मागणी त्यांनी केली.