कल्याण पूर्वेत भररस्त्यात कोसळली बेकायदा स्वागत कमान

कल्याण : कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात दहीहंडी उत्सवासाठी लावलेली बेकायदा स्वागत कमान अचानक भर रस्त्यावर कोसळली. घटनेच्या वेळी शाळेची एक रिक्षा आणि काही प्रवासी या ठिकाणी उपस्थित होते, मात्र सुदैवाने ते सर्वजण या अपघातातून बचावले.

घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी तातडीने दाखल होत युद्ध पातळीवर काम करत कमान बाजूला काढून मार्ग मोकळा करण्यात आला. मात्र भर रस्त्यावर कमान कोसळल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

अलीकडेच जाहिरातीचे मोठमोठे होर्डिंग कोसळून काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर अनेक जण विविध घटनेत जखमी झाले आहेत. यामुळे बेकायदा होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आता विविध उत्सवांसाठी शहरभर नाक्या नाक्यावर बेकायदेशीर कमानी लावण्यात आल्या आहेत. या कमानी लावतांना केडीएमसी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात येत नाही.

याबाबत ड प्रभाग सहायक आयुक्त धनंजय थोरात यांनी विचारले असता, चक्की नाका येथे लावलेली ही कमान बेकायदेशीर आहे. ही कमान लावणाऱ्या मंडप वाल्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान अशा प्रकारे बेकायदेशीर कमानी लावणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करायला पाहिजेत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.