पुलाखाली बेकायदा गाळे-गोडाऊन; प्रभाग समितीने दाखवले करून

सुरेश सोंडकर/ठाणे
शहरातील पुलांखाली असलेली अनधिकृत बांधकामे आणि वाहनतळ यांच्यावर कारवाई करून त्याखाली उद्यान निर्मिती करण्याचे प्रशासनाचे धोरण असताना माजिवडे पुलाखाली बेकायदेशीरपणे गाळे बांधण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर बांधकाम सुरू असताना माजिवडे-मानपाडा प्रभाग समितीने तोडक कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहरातील पुलांखाली बेकायदेशीरपणे भंगार आणि सुस्थितीतील वाहने उभी करण्यात आल्याने पुलाखालील परिसराला बकाल अवस्था प्राप्त झाली होती. तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल आणि त्यानंतर नियुक्त झालेल्या आयुक्तांनी पुलाखालील जागा मोकळी करून लहान-मोठी उद्याने उभारून शहराच्या सौंदर्यात भर पाडली होती. सध्या मात्र या धोरणाला वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यात येत असल्याचे माजिवडे-मानपाडा प्रभाग हद्दीत पाहायला मिळत आहे. किंबहुना हे शहरातील एकमेव उदाहरण असावे, असे बोलले जात आहे.
माजिवडे नाक्याहून नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर माजिवडे पुलाखाली बेकायदेशीरपणे पक्के बांधकामाचे गाळे बांधण्यात आले आहेत. काही महिन्यांपूर्वी ही बांधकामे सुरू असताना याबाबत प्रभाग समितीतील अधिकाऱ्यांना कळविण्यात आले होते, अनेक तक्रारीही जागर फाउंडेशनने केल्या होत्या. मात्र येथील सहायक आयुक्तांनी दुर्लक्ष केल्याने आज येथे अनेक गाळे बेकायदेशीरपणे उभे राहिले तसेच या गाळ्यांना सुविधाही पुरविण्यात आल्याचे कळते.
विद्यमान आयुक्तांना याबाबत दोन लेखी पत्रे देऊन हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची विनंती केली होती. आयुक्तांनी पुढील कार्यवाहीसाठी प्रभाग कार्यालयास निर्देश दिल्याचे कळते, मात्र तीन महिने उलटूनही यावर कारवाई झाली नसल्याने प्रभाग कार्यालय कोणाच्या दबावाखाली कारवाई करण्यास धजावत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
थेट पुलाखाली ही बांधकामे असून बाजूने वेगाने वाहने धावत असतात. त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहेच शिवाय गाळे बांधणाऱ्यांना पाठीशी घालून प्रभाग समितीने ठामपा प्रशासनाच्या धोरणाविरुद्ध वर्तन केल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती घेऊन सांगतो, असे सांगितले तर सहाय्यक आयुक्तांचा संपर्क होऊ शकला नाही.
आयुक्त अभिजित बांगर यांनी माजिवडे आणि कापूरबावडी नाक्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी काही उपाययोजना आखल्या आहेत. यासाठी त्यांनी या नाक्यांची पाहणीही अनेकवेळा केली आहे. बाजूलाच असलेल्या या अतिक्रमित पुलाकडे लक्ष न गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.