१४ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त
ठाणे : अवैधरित्या विदेशी बनावट मद्य चारचाकी वाहनातून चोरट्या मार्गे विक्रीसाठी चाललेल्या त्रिकुटाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागाने जेरबंद केले असून त्या त्रिकुटात एका अल्पवयीन बालकाचा समावेश आहे. त्यांच्यावर अशाप्रकारचे यापूर्वी ही गुन्हे दाखल आहेत. तसेच त्या त्रिकुटाकडून १४ लाख ३५ हजार २४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आला असून चारचाकीसह दुचाकी आणि स्कॉच मद्य, तसेच विविध कंपनीचे लेबर, रिकाम्या बाटल्या आदी साहित्याचा यामध्ये समावेश आहे.
ठाणे-बेलापूर रोड,तुर्भे रेल्वे स्टेशन समोर बनावट विदेशी मद्य विक्रीसाठी वाहतुक केली जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागाला मिळाली होती. त्यानुसार ०८ फेब्रुवारीला त्याठिकाणी सापळा रचून संशयित रित्या चाललेल्या चारचाकी वाहनावर छापा टाकून धारावीतील सुनिल शांतीभाई वाघेला (३५), कांदिवलीमधील उमेश जितेंद्र दुबे ( ३३) आणि नवीमुंबई परिसरातील साहिल नामक विधी संघर्ष गस्त बालक ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडील कारमधुन बनावट स्कॉच मद्याच्या सिलबंद बाटल्या, विविध ब्रॅन्डच्या रिकाम्या बाटल्या व दोन मोबाईल जप्त केले. तसेच ते भाडेत्वावर राहत असलेल्या नवीमुंबईमधील घरातून विविध ब्रॅन्डच्या बनावट स्कॉच मद्याच्या सिलबंद बाटल्या, रिकाम्या बाटल्या, ८०० विविध ब्रॅन्डचे लेबल,०२ ड्रायर व ०२ टोचे ही जप्त केले आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीसह व विदेशी मद्याचा बाटल्या व एक मोबाईल असे एकुण १४ लाख ३५ हजार २४० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. अल्पवयीन बालकाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.याप्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क, ठाणे विभाग,अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क, “ई-१” विभाग ठाणे दुय्यम निरीक्षक संजय राठोड हे करत आहेत.