खासदार नरेश म्हस्के यांनी केली चौकशीची मागणी
ठाणे: अनधिकृत बांधकामांबाबत न्यायालयाने ताशेरे ओढले असतानाही ठाणे शहरातील बेकायदा बांधकाम थांबायचे नाव घेत नाही. माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या आशिर्वादामुळे सुरु असलेल्या बांधकामांबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. या प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांच्या आशिर्वादामुळे ही बांधकामे होत असल्याची लेखी तक्रार ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. या प्रभाग समिती क्षेत्रात बिनधास्त चाळी, सात ते आठ मजल्याच्या इमारती अवघ्या सहा महिन्यात उभ्या राहत आहेत. भू माफियांनी खाडी आणि महापालिकेचे आरक्षित भूखंड देखिल सोडले नाहीत. या प्रभागातील अधिकारी कर्मचारी यांचे हात ओले करून अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. त्याचप्रमाणे अनधिकृत फेरीवाल्यांनी देखिल रस्ते व्यापले आहेत. या प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांच्या विरोधात यापूर्वी देखिल लोकप्रतिनिधींनी लेखी तक्रार केली होती. त्यामुळे आयुक्त श्री. राव यांनी या प्रभाग समितीमध्ये बिनधास्त सुरु असलेल्या बांधकामांची चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.
खा. श्री. म्हस्के यांनी अनधिकृत बांधकामांबाबत संताप व्यक्त करून या भागातील बांधकामांची चौकशी करून सहाय्यक आयुक्तांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
लेखी तक्रारींना केराची टोपली
बाळकुम पाडा १,२ आणि तीन मधील बेकायदा बांधकामे तसेच नाशिककडे जाणाऱ्या माजिवडे पुलाखाली झालेली बेकायदेशीर गाळ्यांची बांधकामे याकडे डोळेझाक केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोठारी कंपाऊंडमध्ये एकाही हुक्का पार्लरला अग्निशमन दलाचे प्रमाणपत्र नसून बेकायदेशीर बांधकामे केलेली आहेत. याबाबतच्या लेखी तक्रारींना केराची टोपली दाखवण्यात आली आहे. हा भाग समाविष्ट असलेल्या वर्तकनगर प्रभागाचा प्रभार देखील माजिवडे मानपाडा प्रभागाच्या सहायक आयुक्तांकडे आहे.