तीन भूमाफियांवरएमआरटीपीचे गुन्हे दाखल
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील आय प्रभागातील बेकायदा इमारती, बेकायदा चाळी तोडण्याची मोहीम शुक्रवारपासून आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी सुरू केली आहे.
या कारवाईत आडिवली ढोकळी येथे दोन विकासकांच्या बेकायदा इमारती, वसार गाव येथे ३२ खोल्यांच्या चाळी, जोते तोडकाम पथकाने भुईसपाट केले. याशिवाय तीन भूमाफियांवर बेकायदा बांधकामप्रकरणी एमआरटीपीचे गुन्हे दाखल करण्यात आले.
आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी रहिवास मुक्त असलेल्या बेकायदा इमारती प्राधान्याने जमीनदोस्त करण्याचे आदेश दिेले आहेत. आय प्रभागातील रहिवास मुक्त बेकायदा इमारती तोडण्याची मोहीम साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी आयुक्त डॉ. जाखड, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात सुरू केली आहे.
ढोकळी गाव येथे कोहिनूर रस्त्यावर ओम साई डेव्हलपर्सचे संजय शेळके यांनी तीन माळ्याची बेकायदा इमारत उभारली होती. ही इमारत अनधिकृत असल्याने पथकाने जमीनदोस्त केली. ढोकळी गाव येथे जावेद शेख यांची बेकायदा इमारत भुईसपाट करण्यात आली. वसार येथे दहा चाळींची बेकायदा बांधकामे, नवीन चाळींची उभारणी करण्यासाठी दहा जोते बांधले होते. ही बांधकामे तोडण्यात आली. या कारवाईने भूमाफियांची दाणादाण उडाली आहे.
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथे जमीन मालक बाळाराम म्हात्रे, मे. राम डेव्हलपर्सतर्फे भागीदार शिवकुमार राममिलन मिश्रा, सागर राममिलन मिश्रा यांनी साई छाया या बेकायदा आठ माळ्याच्या इमारतीची उभारणी केली आहे. याप्रकरणी अधीक्षक शंकर जाधव यांनी जमीन मालक, विकासकांवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला आहे.
आय प्रभाग हद्दीतील वसार, ढोकळी, आडिवली, भाल परिसरात बेकायदा इमारती, चाळींच्या ठिकाणी पाण्याच्या सुविधेसाठी भूमाफियांनी एकेका ठिकाणी ३० ते ४० कुपनलिका खोदून ठेवल्या आहेत. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत. या भागातील बेकायदा बांधकामांना महावितरणाचा चोरून वीज पुरवठा घेण्यात आला होता. या चोरीच्या वीज चोरीप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कळवुनही ते दखल घेत नसल्याची माहिती आहे.
आय प्रभागातील बेकायदा इमारती, बेकायदा चाळी, निर्माणाधीन कामे जमीनदोस्त करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. वसार, आडिवली, ढोकळी भागात कारवाई केली जात आहे. इतर भागातील बेकायदा बांधकामे या मोहिमेत जमीनदोस्त केली जाणार आहेत. विकासक, जमीन मालकांवर एमआरटीपीचे गुन्हे दाखल केले जात असल्याची प्रतिक्रिया आय प्रभाग साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी दिली.