प्लास्टिक पिशवी वापराल तर सणासुदीत मिळणार दंडाचा प्रसाद

आठवड्यातून दोन दिवस धाडसत्र

ठाणे: ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये ठाणे महापालिकेने प्लास्टिकमुक्त शहरासाठी ‘रणशिंग’ फुंकले आहे. त्यासाठी दर आठवड्याच्या मंगळवारी आणि गुरुवारी दुकानांमध्ये, फेरीवाले, हातगाडीवाल्यांवर धाडी टाकण्याची योजना आखण्यात आली आहे.

प्लास्टिकच्या एकल वापर होणार्‍या वस्तूंचे वितरण, विक्री, साठवणूक करणार्‍यांवर ही कारवाई होणार असून नियमांचे उलंघन झाल्यास दंडाचा प्रसादही देण्याची तयारी करण्यात आली आहे.

केंद्रीय पर्यावरण विभागाच्या आदेशानुसार ठाण्यात प्लास्टिक बंदी लागू आहे. मात्र तरीही अनेक दुकानांमध्ये, फेरीवाल्यांकडून सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. याशिवाय अनेक समारंभांमध्ये प्लास्टिकचे ग्लास, चमचे, प्लेटही वापरण्यात येत आहेत. सणासुदीच्या काळात विशेषता गणपती, नवरात्रोस्तवात याचा वापर दुप्पटीने वाढतो. त्यामुळे ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा प्लास्टिक विरोधातील आपली मोहिम तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी सर्व अधिकार्‍यांची बैठक घेतली. प्रभाग समिती स्तरावरील सहाय्यक आयुक्त, घनकचरा, शिक्षण, आरोग्य, अतिक्रमण व निष्कासन, उपआयुक्त मुख्यालय, सुरक्षा, संगणक, समाजविकास, स्थावर मालमत्ता  व प्रदुषण नियंत्रण विभागाला या मोहिमेत सहभागी करून घेत कारवाईचे निर्देश त्यांनी दिले आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने दर मंगळवार व गुरूवार सर्व प्रभागांमध्ये सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यत दुकान, हातगाड्यांवर सिंगल यूज प्लास्टिकबंदीबाबत करवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

शाळांमध्ये जनजागृती उपक्रम
शिक्षण विभागाने महापालिकांच्या सर्व शाळांमध्ये सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करणे, तसेच शाळांमध्ये शपथ घेणे, रॅली काढणे. विद्यार्थ्यांना घरातले प्लास्टिक जमा करुन आणावयास सांगणे इत्यादी उपक्रम राबवण्यास सांगितले आहे.  तसेच सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत निबंध, पेंटीग, टाकाऊपासून टिकाऊ स्पर्धो घेण तसेच कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना ही या बैठकीत देण्यात आल्या.

समाज विकास विभागाने महिला बचत गटामार्फत कापडी पिशवी तयार करुन विक्रीसाठी मार्केट परिसरात स्टॉल लावणे, संबंधित विभागाने झोपडपट्टीमधून कापड गोळा करणे व कापडी पिशव्या तयार करुन त्याबाबत योजना सादर कराव्यात असेही या बैठकीत नमूद करण्यात आले.

काय वापरु नये

सजावटीसाठी प्लास्टिक आणि पॉलिस्टीरिन (थर्माकोल), मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड व सिगारेटची पाकिटे यांची प्लास्टिक आवरणे, प्लास्टिकच्या काड्यांसह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लास्टिक काड्या, प्लास्टिकचे झेंडे, कँडी कांड्या, आईस्क्रीम कांड्या प्लेटस्, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे, चाकू, पिण्यासाठीचे स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या, १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे पीव्हीसी बॅनर्स यावर बंदी, कंपोस्टेबल प्लास्टिक (कचरा व नर्सरीसाठीच्या पिशव्या सोडून), सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (कॅरी बॅग्स, नॉन वोवन बॅग्स सह) हॅण्डल असलेल्या व नसलेल्या, डिश, बाऊल, कॅन्टेनर (डबे)