राज ठाकरे यांचा मिश्किल टोला
मुंबई : क्रिकेटमध्ये जसं सगळं बदलत गेलं, तसंच आमच्या राजकारणात देखील बदल झाले आहेत. क्रिकेटमध्ये अंपायरनी आऊट दिल्यावर थर्ड अंपायर असतो. मला वाटतं गेल्या निवडणुकीच्या वेळी आम्हाला देखील थर्ड अंपायर मिळाला असता तर कदाचित अनेक निकाल बदलले असते. मात्र आमच्याकडे थर्ड अंपायर नसल्याने आम्ही देखील काही करू शकलो नाही, असा मिश्किल टोला लगावत राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.
क्रिकेटचे गुरू द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांची आज 92 वी जयंती आहे. या दिवसाचं औचित्य साधून मुंबई क्रिकेटची पंढरी असलेल्या शिवाजी पार्क मैदान परिसरात आचरेकर सरांचं एक स्मारक उभारण्यात आले आहे. गेट नंबर 5 जवळ उभारलेल्या या स्मारकाचे अनावरण आचरेकर सरांचा सर्वात आवडता शिष्य भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचलेल्या आचरेकर सरांच्या माजी विद्यार्थ्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही विशेष उपस्थिती होती. हे स्मारक उभारण्याची संकल्पना राज ठाकरे यांचीच. त्यामुळे इथं सरांचा पुतळा उभारण्याऐवजी क्रिकेटचं दर्शन घडवणारं एक अनोख स्मारक उभारण्यात आले आहे, ज्यात दिग्गज क्रिकेटर्सची स्वाक्षरी असलेली बॅट, स्टम्प्स, ग्लोव्हज आणि आचरेकर सरांची ओळख असलेली त्यांची रोमिओ हैट बसवण्यात आली आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते.
खऱ्या अर्थाने हे स्मारक या आधीच व्हायला पाहिजे होते. कारण रमाकांत आचरेकर सर म्हटले की सचिन तेंडुलकर हे नाव समोर येते. कारण मला वाटत नाही की भारतात आचरेकर सरांनी जेवढे खेळाडू तयार केले तेवढे एखाद्या कोचने तयार केले असतील, असे मला वाटत नाही. ज्यावेळेस आपल्या देशात, राज्यात फ्लाय ओवर्स, महामार्ग इत्यादीसारख्या अनेक गोष्टी तयार होत असताना तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना अशा लोकांची नावे दिली पाहिजेत. आपल्या इथे असलेला सर्वात मोठा रस्ता हा महात्मा गांधींच्या नावाने आहे. मात्र महात्मा गांधींचे जे गुरु आहेत गोपाळ कृष्ण गोखले तो आमचा गोखले रोड आहे. गुरु नावाची काय व्यक्ती असते? काय परंपरा असते? ही गोष्ट आपल्याकडे नाहीचं, असे श्री.ठाकरे म्हणाले.
ज्यावेळेस दहावी-बारावीचे विद्यार्थी माझ्याकडे येत असतात त्यावेळी मी त्यांना विचारत असतो की पुढे काय करायचे आहे? त्यावर ते वेगवेगळी उत्तर देतात. मात्र एकही विद्यार्थी असे म्हणत नाही की मला शिक्षक व्हायचे आहे. देशात मुलांना शिक्षक व्हावेसे वाटत नाही, या देशाचा पुढे काय होईल, हे मला कळत नाही. आचरेकर सरांच्या घरी सचिन तेंडुलकर दरवर्षी न चुकता नमस्कार करायला आणि आशीर्वाद घ्यायला यायचे. आमच्याकडे गुरुपौर्णिमा ही केवळ मोबाईल पुरती आणि मेसेज पुरती मर्यादित राहिली आहे. गुरु नावाची जी व्यक्ती असते ती जोपासणे महत्त्वाचं आहे, असेही श्री.ठाकरे म्हणाले.
आचरेकर सरांचे योगदान एवढे मोठे आहे की त्यांच्या नावे एखादा स्मारक व्हावं, काहीतरी मोठं कार्य व्हावं, असं मला मनापासून वाटत होतं. त्यासाठी मी अनेक लोकांसोबत बोललो होतो. मात्र मला आचरेकर सरांचा पुतळा नको होता. आपल्याकडे पुतळे भरपूर झाले आहेत. त्यामुळे मी वेगळी कल्पकता वापरून स्मारकाऐवजी जिथे स्टम्प आहेत,ग्लोज आहे बॅट बॉल आहेत, यासह आचरेकर सरांची सरांची टोपी आहे. ती कॅप आचरेकर सरांची खास ओळख होती, त्याचे स्मारक केलं. असे ही राज ठाकरे म्हणाले.