* तंटामुक्त गृहनिर्माण संस्था अभियान
* हाऊसिंग फेडरेशनच्या मेळाव्यात सीताराम राणे यांचा विश्वास
ठाणे : तंटामुक्त हाऊसिंग सोसायटी अभियानात सोसायट्यांनी सहभागी झाल्यास शासनदरबारी केल्या जाणाऱ्या तक्रारींचा बोजा बऱ्याच प्रमाणात कमी होईल, असा विश्वास महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन तथा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी व्यक्त केला.
ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन व ठाणे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ठाण्यात “तंटामुक्त हाउसिंग सोसायटी अभियानाबाबत मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी स्वयंपूर्ण स्वयं पूनर्विकास आणि देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानाचीही माहिती दिली. ठाण्यातील बी कॅबिन येथील नाईक सभागृहात पार पडलेल्या या मेळाव्याला ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्यासह उपाध्यक्ष राम भोसले, कोषाध्यक्ष निंबा पाटील, सचिव ज्ञानू चोरगे, संचालक विनोद देसाई, हिंदुराव गळवे, संचालिका विद्या चौधरी, आकांक्षा चौधरी आणि सहकारी उपनिबंधक कार्यालयाच्या अधिकारी अनिता बटवाल उपस्थित होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना सीताराम राणे यांनी ‘तंटामुक्ती योजनेत सोसायट्यांनी सहभागी होण्याबाबतची प्रक्रिया विषद केली.
राज्यात मार्च २०२१ अखेर एकूण २,१७,४१० नोंदणीकृत सहकारी संस्था असुन यापैकी १,१५,१७२ सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत.एकट्या ठाण्यातच ३४ हजार सोसायट्या आहेत. राज्यभरातील सहकारी गृहनिर्माण संस्थेतील कामकाजाबाबत शासनाकडे मोठया प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत आहेत. परंतु, सहकारी संस्था अधिनियम, नियम व उपविधीतील तरतुदीप्रमाणे कामकाज केल्यास सोसायट्यांचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होऊन सदस्यांच्या तक्रारींचे प्रमाणही कमी होईल. तेव्हा, मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण संस्थांनी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या तंटामुक्त सोसायटी अभियानात सहभागी व्हावे. असे आवाहन राणे यांनी केले. शासनाकडुन दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी सोसायट्यांकडून कमी प्रतिसाद मिळत असल्याची खंत व्यक्त करून राणे यांनी यामध्ये जास्तीत जास्त सहभागासाठी सोसायट्यांनी फेडरेशनशी संपर्क साधावा, असे सांगितले.
दरम्यान, सोसायट्यांनी स्वयंपूर्ण स्वयं पुर्नविकास करणे, कसे लाभदायक आहे. याबाबत उहापोह करताना २०१९ च्या अंमलबजावणी न झालेल्या अधिसुचनेतील तरतुदीची माहिती दिली. या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्या बाबत नविन सरकारकडून अपेक्षा आहेत. केंद्र स्तरावर निर्माण झालेल्या सहकार विभागामार्फत उत्कृष्ट व्यवस्थापन असलेल्या गृहनिर्माण संस्थांना जिल्हा स्तरावर पुरस्कार दिले जाणार असुन त्यासाठीचे निकष जाहिर झाल्यावर मोठ्या प्रमाणात सोसायट्यांनी सहभागी व्हावे. असे आवाहनही राणे यांनी केले. प्रारंभी, प्रास्तविकात राम भोसले यांनी, फेडरेशन करीत असलेल्या कामकाजाची माहिती दिली. तर उपनिबंधक अधिकारी अनिता बटवाल यांनी तंटामुक्तीसह अनेक योजनांची माहिती देऊन बहुतांश गृहनिर्माण संस्थानी शासनाच्या विविध उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. मेळाव्याच्या समारोप प्रसंगी उपस्थितांच्या विविध शंका, समस्यांचे निराकरण करण्यात आले.
हाऊसिंग फेडरेशन करणार ७५ माजी सैनिकांचा गौरव
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत केंद्र सरकारकडून ‘हर घर तिरंगा ‘ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला हातभार म्हणून ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने सोसायट्यांना शासकिय दराच्या ५० टक्के दरात ध्वज उपलब्ध केले जाणार आहेत. त्याचबरोबर फेडरेशन ठाण्यातील ७५ निवृत्त सैनिकांचा गौरव करणार असून सैनिकांना सन्मानित करून तिरंगा ध्वज भेट दिला जाणार आहे. या समारोहाला राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सीताराम राणे यांनी दिली.