युवा सेनेचे पुर्वेश सरनाईक यांचा इशारा
ठाणे : वर्तकनगर येथे नव्याने सुरु होत असलेल्या मुलांच्या रुग्णालयात स्थानिक तरुण-तरुणींना नोकरी व रोजगार दिला नाही तर रुग्णालय सुरु होण्याआधीच त्याला टाळे ठोकू, असा इशारा ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व युवासेनेचे नेते पुर्वेश सरनाईक यांनी दिला.
शुक्रवारी ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व युवासेनेचे नेते पुर्वेश सरनाईक यांच्या माध्यमातून स्थानिकांना नोकरी व रोजगार मिळावा यासाठी वर्तकनगर विभागात येथे नव्याने सुरु होत असलेल्या एम. एम. आर. चिल्ड्रन्स हॉस्पिटल येथे आंदोलन करून निवेदन देण्यात आले. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे.
वर्तकनगर येथे एम. एम. आर. चिल्ड्रन्स हॉस्पिटल सुरु होत आहे. येथे स्थानिक तरुण-तरुणींना शैक्षणिक पात्रता असतानाही नोकरी/रोजगारासाठी डावलण्यात येत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून पुर्वेश सरनाईक यांच्याजवळ करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पुर्वेश सरनाईक यांनी स्थानिकांसहित रुग्णालयाला धडक दिली. यावेळी पूर्वेश सरनाईक यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला निवेदन दिले. या संदर्भात निर्णय घेण्यासंदर्भात ४८ तासांचा अवधी दिला आहे. जर व्यवस्थापनाने याची गंभीर दखल घेतली नाही तर हॉस्पिटल सुरु होण्याआधीच त्याला टाळे ठोकू, असा इशारा पुर्वेश सरनाईक यांनी दिला आहे.
यावेळी शिवसेना विभागप्रमुख रामचंद्र गुरव, शिवसेनेचे संदीप डोंगरे, भगवान देवकाते, अन्य पदाधिकारी आणि स्थानिक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.