ठाणे : रस्त्यावर कचरा शिल्लक राहू नये, दररोज तो उचलला जावा याबाबत ठाणे महापालिकेचे आयुक्त गंभीर असून डंपर पूर्णपणे कचऱ्याने भरला नाही तर संबंधित कर्मचाऱ्याला घरी बसण्याची वेळ येऊ शकते.
ठाणे शहरात आयुक्त पदाचा प्रभार स्वीकारल्यानंतर अभिजित बांगर यांनी स्वच्छ आणि सुंदर शहरासाठी पाहणी दौरे सुरू केले असून अधिकाऱ्यांनाही कामाला लावले आहे. स्वच्छता निरीक्षकाला त्यांच्या कार्यक्षेत्रात किमान दोन स्पॉट कचरामुक्त करण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. विशेष करून झोपडपट्ट्यांच्या परिसरात कचरामुक्ती कशी होईल या दृष्टीने सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचे सर्व स्वच्छता निरीक्षक देखील कामाला लागले असून परिणामी केवळ तीन दिवसांत शहरात तब्बल ९० स्पॉट हे कचरामुक्त झाले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
ठाणे शहरात दररोज एक हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होत असून हा कचरा गोळा करण्यासाठी पालिकेजवळ १५० पेक्षा अधिक घंटागाड्या आहेत. कचरा डम्पिंगपर्यंत नेण्यासाठी डंपरची व्यवस्था करण्यात आली आहे. बऱ्याच वेळा रस्त्यावरील कचरा हा अर्धवट स्वरूपात नेला जात असल्याने तो कचरा रस्त्यावर तसाच पडून राहतो. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी जराही कचरा राहू नये यासाठी कचरा वाहून नेणारा डंपर हा पूर्णपणे भरला गेला पाहिजे अन्यथा संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.