एकनाथ शिंदे यांचे मतदारांना पत्र
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला भरभरून मतदान केल्याबद्दल मतदारांचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडका शेतकरी, युवा, ज्येष्ठ नागरिक यांनी शिवसेनेवर मतांच्या माध्यमातून जो स्नेहाचा वर्षाव केला, जो विश्वास दाखवला तो आम्ही कधीही विसरणार नाही,असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांचे पत्र जसेच्या तसे
प्रिय मतदार,
बंधु आणि भगिनींनो..
विधानसभा निवडणुकांच्या निकालात आपण शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या पदरात भरभरून दान दिलं. आपणाला कोटी कोटी धन्यवाद… आपण शिवसेनेसह महायुतीच्या घटकपक्षांवर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू.
वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार वाटचाल करणाऱ्या शिवसेनेला मतदारांनी दिलेला कौल हा आम्ही गेल्या अडीच वर्षात केलेल्या विकासामुळे मिळाला आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वसा, देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे आम्हाला मिळत असलेले मार्गदर्शन आणि सहकार्य यामुळे महायुती अधिकच भक्कमपणे कार्य करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विकसित भारत संकल्पनेला वास्तवात आणण्यासाठी महायुती 24×7 कार्यरत राहील.
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडका शेतकरी, युवा, ज्येष्ठ नागरिक यांनी शिवसेना महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केला आहे तो आम्ही कधीच विसरणार नाही. आपला महाराष्ट्र देशात सदैव अग्रेसर राहण्यासाठी आमचा यापुढेही प्रयत्न राहील.
80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही शिवसेनेची कार्यपद्धत आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील सामाजिक पाया भक्कम करतानाच राज्यातील महिला, युवा, शेतकरी गरिबांच्या कल्याणासाठी भविष्यातअधिक जोमाने काम करण्याची ताकद आपण आम्हाला दिली आहे. आम्ही आपल्या ऋणात राहून महाराष्ट्राच्या कल्याणासाठी झटत राहू, अशी ग्वाही यानिमित्ताने देतो.
या निवडणुकीत शिवसैनिकांनी घेतलेल्या मेहनतीचं हे फळ आहे.महायुती सरकारने अडीच वर्षात केलेलं काम गावोगावी, नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचं काम शिवसैनिक आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे.
रात्रीचा दिवस करून आपण टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी आम्हाला आपलं भक्कम पाठबळ मिळालं आहे. चला महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा सज्ज होऊया… पुनश्च एकदा आपले आभार…