मदरशांमध्ये वस्तराही सापडला तर राजकारण सोडून देईन

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे राज ठाकरे यांना आव्हान

ठाणे : ‘कोणत्याही मदरशामध्ये कधीही जा, एक साधे हत्यार जरी सापडले तरी राजकारण सोडून देईन’, असे खुले आव्हान गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिले. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करू नका असे आवाहनही त्यांनी केले आहे.

शिवाजी पार्क येथे काल मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुंब्रा येथील मदरशांमध्ये काय काय असते हे पोलिसांना माहीत आहे, असे सांगितले. मदरशांमध्ये हत्यारे ठेवली जातात, असा आरोप त्यांनी केला होता. त्याला आज डॉ. आव्हाड यांनी उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनी माझ्याबरोबर मदरशांमध्ये यावे. साधा दाढी करण्याचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देईन, असे आव्हान आव्हाड यांनी दिले आहे.

महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट असणाऱ्या राज ठाकरे यांनी बेरोजगार युवकांना नोकऱ्या दिल्या नाहीत, परंतु मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावून दोन समाजात तेढ निर्माण झाली की तरुणांवर गुन्हे दाखल होतील, ते जेलमध्ये जातील, तेथे त्यांना रोजगार मिळेल, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचे आदेश त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत, पण पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या चैत्यभूमी येथे कधी राज ठाकरे गेले आहेत का? कधी जयभीम असे बोलले आहेत का? असा सवाल डॉ. आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. ६ डिसेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या भीम अनुयायांबद्दल तुमच्या काय भावना आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत, असे देखील डॉ. आव्हाड म्हणाले.