ठाण्यातील कार्यक्रमात धनंजय मुंडे व्यथित
ठाणे: मी जर एका प्रतिक्रियेला उत्तर दिले असते तर त्या उत्तरातून हजार प्रश्न लोकांनी उपस्थित केले असते. म्हणून मी बोललो नाही, संयम ठेवला. मात्र या २०० दिवसांत मी दोनवेळा मरता-मरता वाचलो. व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेवर टीका करा, धनंजय मुंडेंच्या जातीपर्यंत, जिल्ह्यापर्यंत, आई-बाप आणि मुलाबाळापर्यंत द्वेष कशाला? जगाच्या पाठीवर अशाप्रकारच्या मीडिया ट्रायलद्वारे बदनामी कुठेच झाली नसेल. अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली.
वंजारी समाजाच्या वतीने रविवारी ठाण्यातील टीप टॉप प्लाझा या ठिकाणी राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाला धनंजय मुंडे यांना वंजारी समाजाच्या वतीने निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जीवनात पहिल्यांदा आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात समाजाने गुणवंतांचा सत्कार करायला मला बोलावले आहे. इतके दिवस तुम्ही बोलावत नव्हता. म्हणून मला येता येत नव्हते. आता अचानक तुम्ही मला बोलावले आणि मी आलो, याला म्हणतात संघर्ष. आज ज्या सकल समाजाच्या वतीने समाजातील गुणवंतांचा माझ्या हस्ते सत्कार केला, त्या समाजाने किती शिव्या दिल्या हे मला माहीत आहे. मला खोटे बोलायला जमत नाही, असा भावनिक संवाद देखील मुंडे यांनी यावेळी समाजासमोर साधला. काल शिव्या देणारा समाज आज आपल्या हातून सत्कार घडवतो त्यावेळेला खरा चमत्कार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
आज जे काही माझ्यासोबत झाले, मी राजकीय जीवनात आहे ते सर्व स्वीकारेन, टीका स्वीकारेन. व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेवर करा, जर धनंजय मुंडे चुकला तर त्याला कधीच माफ करू नका, पण माझ्यासहित जात, माझा जिल्हा, एवढा बदनाम करावा हे योग्य नाही. एक-दोन दिवस नाही, २०० दिवस एखाद्या जिल्ह्याची, एखाद्या व्यक्तीची बदनामी मी सहन केली. ज्या समाजात जन्माला आलो त्याचा अभिमान निश्चित आहे. अडचणीच्या काळात ज्याला धनंजय मुंडेचा नंबर आठवतो यापेक्षा दुसरं काय हवं, मंत्री पदाला काय चाटायचे आहे? असेही मुंडे यावेळी म्हणाले. दोष एका व्यक्तीचा असेल तर त्याला फाशी द्या पण त्या आधारावर सगळ्या समाजाला दोषी ठरवणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.
माणिकराव कोकाटे यांच्यावरही साधला निशाणा
माझ्यावर कृषिमंत्री असताना आरोप केले. मात्र नियतीने, न्यायव्यवस्थेने न्याय दिला. असे सांगत धनंजय मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे माणिकराव कोकाटे यांच्यावरही निशाणा साधला. सत्य परेशान हो सकता है पराजित नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.