धरणात पाऊस दमदार; पिण्याच्या पाण्याचे मात्र हाल

ठाणे: रविवारी ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. सुट्टीच्या दिवशीच पाणीपुरवठा बंद ठेवल्याने ठाणेकरांचे चांगलेच हाल झाले. पुढील दोन दिवस देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली असून धरण क्षेत्रातही गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे पिसे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. या गढूळपणामुळे शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर परिणाम होत असल्यामुळे ठाणे शहराकडे येणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे. पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसल्याने पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. पम्पिंगचे काम पूर्ण क्षमतेने होण्यासाठी पंपाच्या स्टेनरमधील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. या कारणामुळे रविवारी ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.

ऐन रविवारी सुट्टीच्या दिवशी पाणी पुरवठा बंद असल्याने ठाणेकरांचे मात्र चांगलेच हाल झाले. सुट्टीच्या दिवशी सर्वच घरातील सदस्य घरीच असल्याने पाणी नसल्याने गृहिणींची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक पाणी पुरवठा बंद झाल्याने पाण्याचे नियोजन करताना गृहिणींच्या तारेवरची कसरत करावी लागली. तर अनेक कामे तशीच ठेवावी लागली अशा प्रतिक्रिया काही महिलांनी दिल्या आहेत. पम्पिंग स्टेशन मधील गाळ काढण्यात आल्यानंतरही पुढील दोन दिवस अपुऱ्या प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तर काळात पाणी उकळून प्यावे आणि पाण्याचा वापर जपून करावा,असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.