सुरेश सोंडकर/ठाणे
एकेकाळी हिरवाईने नटलेले आणि जैवविविधतेले समृद्ध असलेले ठाणे शहर आता सिमेंटच्या जंगलात बदलू लागले आहे. सिमेंटच्या इमारतींचे वारुळ उभे राहत असताना सापांची खरी वारुळे मात्र जमीनदोस्त होऊ लागली आहेत. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत ठाण्यात सर्पदर्शन विरळ होऊ लागले आहे.
एकेकाळी नागपंचमीच्या दिवशी डोंगरांच्या पायथ्याशी, झाडाझुडपांमध्ये, ओसाड जागांमध्ये साप सहज दिसायचे. आज मात्र परिस्थिती अशी आहे की नागपंचमीला नागदर्शन हे फक्त पोस्टर्स, गाणी आणि मातीच्या मूर्तीपुरतेच उरले आहे. मागील १० वर्षांत ठाण्यात साप आढळण्याच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे.
कासारवडवली, घोडबंदर, ब्रह्मांड, डोंगरीपाडा, वर्तकनगर, माजीवाडा या भागांतील झाडी, डोंगर, ओसाड जागा, जिथे सर्पांचे अस्तित्व होते, त्या ठिकाणी आता उंच इमारती झाल्या आहेत. पूर्वी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात साप नागरी वस्तीत येत असत. मात्र आता साप दिसणे काहीसे दुर्मिळ होताना दिसते.
ठाणे महानगरपालिका, वनविभाग आणि बांधकाम यंत्रणांनी सर्प संरक्षणासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. ना संरक्षण क्षेत्र राखून ठेवण्यात आले, ना जागरूकता मोहीम राबवण्यात आली. परिणामी, नागपंचमीचा सणही ‘सांस्कृतिक औपचारिकता’ ठरत आहे.
साप म्हणजे फक्त पूजनीय प्राणी नव्हे, तर तो एक महत्त्वाचा जैवसाखळीतील घटक आहे. जर साप नष्ट झाले, तर उंदीर व इतर किटकांची संख्या प्रचंड वाढेल आणि त्यामुळे शेती, आरोग्य आणि अन्नसाखळीवर परिणाम होईल, अशी भीती ठाण्यातील सर्पमित्र आणि तज्ज्ञ अनिल कुबल यांनी व्यक्त केली.