ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत आज पांचपाखाडी येथील तुळजाभवानी मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी मला माझा राम चराचरात, जनसेवेत आणि माझ्या कामात दिसतो, अशा भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादीने आज शहरातील विविध मंदिरांमध्ये सुमारे दीड ते दोन लाख लाडूंचे वाटप केले.
अयोध्येत श्री रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात असल्याने ठाण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अनेक मंदिरात लाडूवाटप करण्यात आले. तसेच, मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला कळवा पूर्वेत भागात रामललाची मिरवणूकही काढण्यात आली होती. आज दुपारी बारा वाजता पांचपाखाडी येथील तुळजाभवानी मंदिरात आरती करण्यात आली. यावेळेस शहराध्यक्ष सुहास देसाई, महिलाध्यक्ष सुजाता घाग, महिला कार्याध्यक्ष सुरेखा पाटील, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे यांच्यासह शेकडो भाविक उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आज प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे, याबद्दल तमाम भारतीयांच्या मनात आनंद दाटून आला आहे. हा राम कुण्या एकाचा नाही तर हा राम भारत भूमीवर जन्माला आलेल्या प्रत्येकाचा आहे. त्यामुळेच आमच्या रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्यानेच आज आम्ही महाआरतीचे आयोजन केले होते. तसेच कळव्यात सुमारे 50 हजार झेंडे आणि एक लाख लाडूंचेही वाटप विविध मंदिरांमध्ये केले.
निमंत्रणाबाबत विचारले असता, निमंत्रण देणे हा कुणाचाच अधिकार नाही. तुळजाभवानी मंदिरात आयोजित महाआरतीचे निमंत्रण दिलेय का? देव हा सगळ्यांचाच आहे. त्यामुळे देवाच्या चरणी लीन होण्यासाठी निमंत्रण कशाला? देवाची मालकी सांगण्याचा जो प्रकार सुरू झालाय तो मनाला खटकण्यासारखा आहे. तरीही आपण या ठिकाणी सांगतो की आपणाला आपला राम कामात दिसतो; मला तो तुळजाभवानी मंदिरात दिसतो, असेही डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले. या प्रसंगी शेकडो कार्यकर्ते, भाविक उपस्थित होते.