गुन्ह्याशी माझा संबंध नाही : राज ठाकरे यांचा जबाब

उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण प्रकरण

ठाणे: २००८ साली घेण्यात आलेल्या रेल्वे भरतीवेळी मनसेच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनात कल्याण स्थानकात उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सुनावणीसाठी ठाणे न्यायालयात मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. न्यायालयात त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. यावेळी त्यांनी घटनेवेळी नाशिक येथे होतो असे सांगून माझा या गुन्ह्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले.

2008 साली रेल्वे भरतीदरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचे देखील मोठे नुकसान केले होते. “मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या” असा आरोप करत, राज ठाकरे यांनी आणि मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीयांना या आंदोलनात लक्ष्य केले होते. तसेच, आंदोलनात हिंसाचाराला प्रोत्साहन दिले, असे आरोपही त्यात करण्यात आले होते. या हल्ल्यांच्या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. राज ठाकरेंसह सात जणांवर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी, न्यायालयात आज सुनावणी झाली.

न्यायालयात आज, 2008 साली रेल्वेभरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे सोडून इतर कार्यकर्त्यांवर जे आरोप आहेत त्याबद्दल न्याय‍धीशांकडून जबाब वाचून दाखवण्यात आले. उत्तर भारतीय परीक्षार्थीना मनसे कार्यकर्त्यांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली, या मारहाणीत परीक्षार्थीना मार लागला, ते जखमी झाले होते, असा जबाब वाचून दाखण्यात आला. त्यानंतर, साक्षीदारांचे जवाब वाचून दाखवण्यात आले.

न्यायालयाने सुनावणीची १८ मे ही पुढची तारीख दिली असून राज ठाकरेंना हजर राहण्याची गरज नसल्याचेही त्यांचे वकील विजय नांगरे यांच्याकडून सांगण्यात आले.