आतापर्यंत ११ शाळांवर कारवाई
अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील अंबरनाथ आणि बदलापूर शहर तसेच ग्रामीण भागात सध्याच्या घडीला आठ अनधिकृत शाळा सुरू असल्याची माहिती अंबरनाथच्या पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने दिली आहे. यातील काही शाळांना गेल्या दोन वर्षांपासून नोटीसा देऊनही त्या शाळा सुरू असल्याचे समोर आले असून त्या आठ शाळांवर गेल्याच वर्षात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. यातील एका शाळेला स्थलांतराची परवानगी मिळाली आहे.
अंबरनाथ तालुक्यातील शहरांचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. ग्रामीण भागातही नागरिकरण वेगाने झाले. वाढत्या लोकसंख्येसोबतच तिथे शिक्षणाच्या खासगी सुविधाही वेगाने वाढल्या. परिणामी कोणत्याही परवानगीशिवाय शाळांना सुरूवात झाली. या शाळांच्या तपासणीनंतर या शाळा नियमांची पूर्तता करत नसल्याचे समोर आले. स्थानिक पंचायत समितीच्या माध्यमातून गटशिक्षण अधिकारी अशा शाळांना वेळोवेळी नोटीसा देऊन, गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करत असतात. मात्र त्यानंतरही अनेक निर्ढावलेल्या शाळा कोणत्याही नियमांची पूर्तता न करता बिनदिक्कतपणे शाळा सुरू ठेवत असल्याचे समोर आले आहे.
यंदाच्या वर्षातही गटशिक्षण अधिकारी डॉ. विशाल पोतेकर यांनी जाहीर पत्रकाद्वारे अंबरनाथ तालुक्यातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. यात अनिरूद्ध हायस्कुल व ज्युनियर कॉलेज कुळगाव, श्री चैतन्य टेक्नो स्कूल, बदलापूर, नवजीवन इंटरनॅशनल स्कूल, वांगणी, तिसाई विद्यालय, आडिवली भाल, श्री स्वामी समर्थ प्राथमिक विद्यामंदिर, आडिवली भाल, श्री स्वामी समर्थ माध्य. विद्यामंदिर, आडिवली भाल, रूद्र इंटरनॅशनल स्कूल, डोणे, वांगणी, विहा इटरनॅशनल स्कूल, जुवेली या शाळांचा समावेश आहे.
यातील काही शाळांना २०२४-२०२५ आणि या वर्षात नोटीसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांना गुन्हा दाखल करण्याबाबतही नोटीसा देण्यात आल्या होत्या. दंडात्मक कारवाईच्या नोटीसीनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यातील तिसाई विद्यालय स्थलांतरीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती अंबरनाथ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. विशाल पोतेकर यांनी दिली आहे. तसेच यापूर्वी ११ शाळांवर कारवाई करण्यात आल्याचीही माहिती डॉ. पोतेकर यांनी दिली आहे. तर वरीलपैकी आठ शाळा अजूनही सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.