विजयश्री खेचून आणण्याचा आत्मविश्वास
ठाणे शहर मतदार संघांचे उमेदवार अविनाश जाधव यांच्याशी केलेली खास बातचित..
मागच्या खेपेस तुम्ही फार कमी फरकाने पराभूत झालात. या वेळी आत्मविश्वास कसा आहे?
मागच्या वेळेला खूप घाई झाली. खूप उशिरा आम्ही निवडणूक लढविण्याचे ठरवले, मात्र या वेळीआम्हाला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे आम्ही सहा महिने आधीपासून तयारी सुरु केली. प्रत्येक गृह संकुलात जाऊन प्रत्यक्ष भेट घेत आहे आणि लोकांचा मनसेकडे कल या खेपेस सर्वात जास्त आहे, त्यामुळे आम्हाला खात्री आहे. यावेळी आमचा विजय निश्चित आहे.
तुमचे या वेळचे प्रचारवाक्य आहे अविनाश जाधव काम करतो 24 तास आणि 24 तासात. याबद्दल काय सांगाल?
सर्वात जास्त आंदोलन करणारा मी ठाणेकर आहे असे मी समजतो. पाण्याचे आंदोलन असेल, हिरानंदानी इस्टेटमधील कचऱ्याचा विषय असेल, कळवा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाचा विषय असेल हे सर्व विषय मी उचलून धरले. योग्य पाठपुरावा करून हे विषय निकालास लावून दिले आहे. लोक हे विसरले नाहीत. मी जेव्हा प्रत्येकाला भेटत आहे त्यावेळेला लोक स्वतःहून मला या विषयांची आठवून करून देतात. मनसेने आंदोलने छेडली त्याचे लाभार्थी खूप आहेत आणि मला खात्री आहे की या वेळेस ते नक्की माझ्या पाठीशी उभे राहतील. माझा जनसंपर्क खूप दांडगा आहे. माझ्या संपर्क कार्यालयात कधीही या, तुम्हाला गर्दी पहायला मिळेल. लोकांची मनसेकडून खूप आशा आहे आणि मनसे त्यांचे काम करील असा आत्मविश्वास पण आहे.
टोलचे श्रेय कोणाचे मनसे की महायुतीचे?
सर्वात पहिले टोलचे आंदोलन राज साहेब ठाकरे यांनी ठाण्यात पुकारले. त्यानंतर अनेक टोल महाराष्ट्रात बंद झाले. आम्ही ठाणेकरांना टोल माफ व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होतो. आमच्या आधी कोणत्याच पक्षाला टोल बंद करावा असे वाटले नाही. त्यामुळे आज महायुतीने टोल बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यात मनसेचा सिंहाचा वाटा आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही.
तुमचा पक्ष स्वप्नातल्या महाराष्ट्राबद्दल बोलत असतो तर तुमच्या स्वप्नातले ठाणे कसे आहे?
ठाण्यासाठी देखील आमची ब्लु प्रिंट रेडी आहे. आमच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती आहे, पण दुर्दैवाने आम्हाला लोकांनी आजवर संधी दिली नाही, त्यामुळे मनसे ठाण्यासाठी काय करू शकेल हे अजून जनतेला कळू शकले नाही.
ठाण्यात खूप काम करता येण्यासारखे आहे. खूप क्षमता आहे पण दुर्दैवाने इतक्या वर्षात तशी ठोस कामे झाली नाहीत. मुंबईच्या सानिध्यात असलेले हे शहर आजही मूलभूत गरजांसाठी धडपड करत आहे. ही शोकांतिका आहे. त्यामुळे मी सर्व ठाणेकरांना विनंती करत आहे एकदा मला संधी द्या आणि बघा. ठाणेकरांना एक आंतरराष्ट्रीय दर्जाची अभ्यासिका उभारण्याचा माझा मानस आहे. ठाणे पर्यटनाच्या दृष्टीने कसे अधिक सुशोभीत करता येईल माझा भर असेल. आपण परदेशात जातो आणि तिकडंच्या मुसिकल फॉउंटाईन चे कौतुक करतो का आपल्या मसुनंदा तलावात तसें कारंजे नसावे? ठाण्यात पार्किंग ची आजही मोठी समस्या आहे जे वाहनतळ आपण तयार केले आहे त्यावर इतके शुल्क आकारले जाते की सर्व सामान्य माणसाला ते परवडत नाही. यावर आम्ही जातीने लक्ष देऊ. अत्याधुनिक ठिकठिकाणी वाहनतळ निर्माण करण्यावर भर असेल ज्यामुळे आपले अरुंद रस्ते श्वास घेऊ शकतील आणि ठाणेकरांना देखील वाहतुक कोंडीपासून दिलासा मिळेल. ठाणे स्टेशन फेरीवाले मुक्त करण्यात देखील मनसेचा सिंहाचा वाटा आहे. या मोहिमेमुळे पदपथ काही प्रमाणात रिकामे झाले आणि लोकांना रस्त्यावर चालणे अधिक सोयीचे झाले. ठाणे महापालिकेचे 3500 -4000 कोटी रुपयांचे अर्थसंकल्प आहे. त्यामुळे पाच वर्षांचे जवळजवळ 20 हजार कोटी झाले. त्यामुळे जर लोकप्रतिनिधीची इच्छाशक्ती असेल तर तो काही करू शकतो.
प्रतिज्ञापत्र
ठाण्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उभे करणार.
ज्येष्ठांसाठी कायमस्वरूपी आरोग्य हेल्पलाईन सुरु
करणार.
लहान मुलांसाठी क्रिडामंदिरे उभारणार.
ठाणे शहरात मृत पाळीव प्राण्यांसाठी अंत्यविधी केंद्र
उभारणार.
ठाणे शहरातील शाळांमध्ये शैक्षणिकदृष्ट्या आणि
पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल करणार.
निवडून आल्यानंतर पहिल्या आठ दिवसांत लोकपुरम
विभाग फेरीवालामुक्त करणार.
फेरीवालामुक्त परीसरासाठी “फेरीवाले झोन” ची
निर्मिती करणार.
कोलशेत खाडीचे सुशोभीकरण करणार.
वीज उपकेंद्र भूखंड उपलब्ध करून देण्याच्या कामास
प्राधान्य देणार आणि पूर्णत्वास नेणार.
ठाणेकरांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही चा दर्जा सुधारणार.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था दर्जात्मकदृष्ट्या सुधारणार.
ठाणे शहराचा, स्वतःचा शाई धरण प्रकल्प राबवून ठाणेकरांचा पाणीप्रश्न कायमचा मिटवणार.
तलावांचे आंतर्राष्ट्रीय दर्जाचे सुशोभीकरण करून जुनी
“तलावांचे शहर” ची ओळख ठाण्याला पुन्हा मिळवून देणार.
प्रत्येक पोलिस स्टेशन मध्ये महिलाशक्ती कक्षाची
स्थापना करून महिला सुरक्षाविषयक व्यवस्था उभारणार.
वाहतूककोंडी पासून ठाणेकरांची कायमची मुक्तता
करण्यासाठी मुंबई-घोडबंदर तसेच मुंबई – नाशिक
आणि मुंबई-नवी मुंबई असे बायपास करण्यासाठी
पाठपुरावा करणार.
एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी
अद्ययावत २४x७ सुरु असणाऱ्या अभ्यासिका उभ्या
करणार.
ठाणे ते घोडबंदर छोट्या इलेक्ट्रिक बसेस सुरु
करण्याचा पाठपुरावा करणार.