पती-पत्नीची खाडीत उडी; पती वाचला,पत्नीचा शोध सुरू

भाईंदर : अहमदाबादवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ब्रिजवरून गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास वरसावे खाडीत एका जोडप्याने उडी मारल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना माहिती झाल्यानंतर यातील पुरुषाला बाहेर काढण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे. तर महिलेचा शोध सुरू आहे.

नायगाव आणि भाईंदरच्या मध्यभागी असलेल्या वरसावे खाडी पूल असून सकाळी दहाच्या सुमारास शशिकला यादव (२८) आणि दिनेश यादव (३२) हे दोघे नायगावहून ब्रिजवर पोहोचले. यानंतर शशिकला या महिलेने वरसावे खाडीमध्ये उडी मारली. पत्नीने उडी मारल्याचे पाहून तिला वाचवण्यासाठी तिचा पती दिनेश यादव यांनी देखील उडी मारली. हा सर्व प्रकार महामार्गावरून येणाऱ्या वाहन चालकांनी पाहून तत्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळी मीरा-भाईंदर अग्निशामक दल, काशिगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोहोचले. घटनास्थळी दाखल झालेल्या पथकांनी खाडीत शोध मोहिमेला सुरवात केली. यात स्पीड बोटच्या साह्याने दिनेश यादव याला वाचवण्यात यश आले आहे. मात्र महिलेला पोहता येत नसल्याने पाण्याच्या प्रवाहामध्ये खाली बुडाली. अग्निशामक दल व स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून संबंधित महिलेचा शोध सुरू असल्याची माहिती काशिगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार सदरचे जोडपे हे नायगावमधील राहणारे असून घरगुती वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेचा तपास काशिगाव पोलीस करत आहेत.