दिव्यातील शेकडो पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत

एकनाथ शिंदे यांना सेना नगरसेवकांचा पाठिंबा

ठाणे : दिवा शहरातील आठ शिवसेना माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले आहे तर ८०० हून जास्त पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली दिव्यात बुधवारी मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक शैलेश पाटील यांच्यासह इतर नगरसेवक आणि शेकडो पदाधिकारी -कार्यकर्ते उपस्थित होते.

ठाण्यात शिंदे समर्थकांकडून गेल्या काही दिवसांपासून शक्तिप्रदर्शन करण्यात येत असून एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर शनिवारी शक्तिप्रदर्शन करून पाठिंबा देण्यात आला. सोमवारी टेम्भी नाक्यावर आनंद आश्रम येथे शक्तिप्रदर्शन केल्यानंतर बुधवारी दिव्यात एकनाथ शिंदे यांच्या पाठींब्यासाठी एकवटले. खासदार श्रीकांत शिंदे आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ५० पेक्षा जास्त आमदार असून एकप्रकारे त्यांनी विश्वास दाखवला आहे. असाच विश्वास दिव्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी दाखवावा असे आवाहन श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितांना केले.