शंभरीचा हिरवा वाटाणा निम्म्यावर

हिरव्या वाटाण्याचा हंगाम सुरू

नवी मुंबई: घाऊक बाजारात दर वाढल्याने किरकोळ बाजारात गगनाला भिडलेल्या वाटाण्याचा नोव्हेंबर अखेरीस स्वस्ताईचा हंगाम सुरू झाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजारात हिरव्या वाटाण्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रतिकिलो शंभरी पार केलेल्या हिरव्या वाटाण्याचे दर निम्यावर उतरले आहेत.

मागील आठवड्यात घाऊक बाजारात प्रतिकिलो १००-१२० रुपयांवरून उपलब्ध असलेला वाटाणा आता ६०-७० रुपयांवर विक्री होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही वाटाणा आवाक्यात आहे. साधारणतः नोव्हेंबर महिन्यापर्यंत हिरव्या वाटाण्याची आवक खूप तुरळक प्रमाणात होते असते. या वाटाण्याच्या मंदीच्या हंगामात आवक कमी असल्याने त्याचे भाव गगनाला भिडत असतात. मात्र आता एपीएमसी बाजारात वाटाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून दरही उतरले आहेत.

सोमवारी एपीएमसीत १८ गाड्यांमधून १२५० क्विंटल आवक झाली आहे. घाऊक बाजारात सध्या वाटाणा ६०-७० रुपये तर किरकोळ बाजारात ८०-९० रुपये किलो दराने विक्री होत आहे. पुढील कालावधीत आणखीन वाटाण्याची आवक होऊन दर आणखीन कमी होण्याची शक्यता आहे. एपीएमसी बाजारात डिसेंबर महिन्यात मोठया प्रमाणात हिरवा वाटाणा दाखल होण्यास सुरुवात होत असते,शिवाय डिसेंबरमध्ये वाटण्याचा खरा हंगाम सुरू होतो तर वर्षभर तुरळक वाटाणा दाखल होत असतो. बाजार समितीत मध्य प्रदेशातून हिरवा वाटाण्याची आवक होते. वाटाणा मंदीच्या काळात एपीएमसीमध्ये २-३ गाड्या आवक होती ती आता १८ गाड्या दाखल झाल्या आहेत. एक महिन्यापूर्वी घाऊक बाजारात वाटाणा १००-१२० रुपये प्रति किलो उपलब्ध असणारा वाटाणा आता प्रतिकिलो ६०-७० रुपयांनी विक्री होत आहे तर किरकोळ बाजारात ८०-९० रुपयांनी विक्री होत आहे.

एपीएमसीत आता हिरव्या वाटण्याचा हंगाम सुरू झाला असून दर उतरले आहेत. डिसेंबरमध्ये आवक वाढणार असून दर आणखीन गडगडतील, अशी माहिती येथील घाऊक व्यापाऱ्यांनी दिली.