हुमायुन बंधाऱ्यामुळे येऊर परिसराची तहान भागणार

आज होणार भूमिपूजन

पावणे तीन कोटीत साकारणार पाच बंधारे

ठाणे : येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जवळपास दोन कोटी ७७ लाख खर्च करून तयार करण्यात येणाऱ्या पाच नवीन बंधाऱ्यांच्या आणि पुन:र्बांधणी करण्यात येणाऱ्या हुमायून बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन उद्या बुधवारी होणार आहे. पुढील १० दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

या बंधाऱ्यांमुळे जे पाणी अडवले जाईल त्यातून ठाणे शहराला ३ ते ४ दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. येऊरच्या आजूबाजूच्या परिसरात पाणी पोहोचविण्यासाठी महापालिका वितरण व्यवस्था तयार करणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

गेल्या अनेक वषार्पासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहून येणारे पाणी तसेच येऊरला नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत असलेले हे स्वच्छ पाणी सर्व खाडीला जाऊन मिळत असल्याने ते वाया जात होते. ही बाब सरनाईक यांच्या लक्षात आल्यानंतर जलसंधारण विभागाच्या आणि वनखात्याच्या अधिकाऱ्यासह पाहणी केली असता, ब्रिटीशकालीन हुमायून बंधारा आणि येऊरच्या परिसरामध्ये पाण्याचा साठा ३६५ दिवस मुबलक प्रमाणात असल्याचे निर्दशनास आले. या ठिकाणी कोल्हापूर बंधाऱ्यांची निर्मिती केली तर तेथे ३ ते ४ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा ठाणे शहराला होऊ शकेल. त्यामुळे येऊरसह शिवाईनगर, कोकणीपाडा, रामबाग, गावंडबाग आणि आजूबाजूच्या परिसरातील जनतेला या पाण्याचा फायदा होणार आहे.

येऊर परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांसह वन्य प्राणी उन्हाळ्याच्या मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये पाण्याच्या शोधात जंगलातून बाहेर पडत होते. त्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होते. येऊरमध्ये नविन निर्माण होणाऱ्या बंधाऱ्यांमुळे वन्य प्राण्यांना ३६५ दिवस मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.