नालेसफाई किती झाली? अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ

ठाणे: पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी नालेसफाईचा दौरा केल्यानंतर ७० ते ७५ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला असला तरी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या दालनात झालेल्या बैठकीमध्ये नालेसफाई केवळ ५० टक्केच झाली असल्याची माहिती देण्यात आली, त्यामुळे अधिकाऱ्यांमध्येच समन्वय नाही का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. नऊ प्रभाग समितीच्या अंतर्गत एकत्रच ही कामे सुरु करण्यात आली असून यासाठी ९ प्रभाग समिती अंतर्गत नऊ स्वतंत्र ठेकेदारांची नियुक्त करण्यात आली आहे. नालेसफाई करताना कर्मचाऱ्यांची सुरक्षा गांभीर्याने घेतली जात नसल्याच्या मुद्द्यावरून प्रशासनावर टीका झाली होती. या मुद्द्यावर सोमवारी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी संबंधित ठेकदारांची बैठक घेऊन नेलेसफाईचा आढावा घेतल्यानंतर ४० ते ५० टक्केच नालेसफाई झाला असल्याचा दावा या बैठकीमधून करण्यात आला आहे.

दरम्यान शहरात सर्व प्रभाग समित्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक नालेसफाई झाली असल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली आहे. केवळ नालेसफाईच नव्हे तर कल्वर्ट आणि गटारांची सफाई देखील समाधानकारक झाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. बुधवारी पालिकेचे सर्व प्रभाग समितीमधील सहाय्यक स्वच्छता निरीक्षक यांची बैठक घेऊन त्यांनी यावेळी नालेसफाईचा संपूर्ण आढावा घेतला. यामध्ये उथळसर प्रभाग समिती वगळता सर्वच प्रभाग समितींमध्ये ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत नालेसफाई झाली असून उर्वरित नालेसफाईही येत्या चार ते पाच दिवसांत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

चौकट
एकूण नाल्यांची लांबी: १,९६,१०० मीटर
एकूण साफ झालेल्या नाल्यांची लांबी: १,४६,९८५.०९
टक्केवारी – ७५ टक्के

प्रभाग समितीनिहाय सफाई

प्रभाग समिती टक्केवारी
मुंब्रा – ७४
कळवा- ७८
माजिवडा-मानपाडा – ७६
कोपरी-नौपाडा – ७१
उथळसर – ७३
वागळे इस्टेट – ७२
दिवा – ७०
वर्तक नगर – ८४
लोकमान्य -सावरकर नगर – ७८
———————————————–
एकूण – ७५ टक्के