आंबेडकरांनी सांगितला आकडा
मुंबई : काही दिवसांपूर्वी मविआच्या बैठकीत सहभागी झालेले वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांकडून होत असलेल्या जागांच्या मागणीबाबत गौप्यस्फोट केला आहे.
लोकसभेच्या जागावाटपाबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ पैकी ४८ जागा लढवाव्यात, अशी भूमिका आमच्या पक्षाची होती. मात्र आता महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू असल्याने आम्ही ती भूमिका थोडी बाजूला ठेवली आहे. परंतु महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसने २४ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने २३ जागा मागितल्या आहेत. या दोघांची मागणीच ४७ जागांवर जाते. त्याच मागणीवर दोन्ही पक्ष अडून बसले तर काय शिल्लक राहणार आहे?” असा खोचक सवाल आंबेडकर यांनी विचारला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी चादर पाहून जागा मागाव्यात, असा टोलाही प्रकाश आंबेडकरांनी लगावला आहे.
२०१९ साली स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली जाणारी ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. त्यातच आता वंचित आघाडीचाही यामध्ये समावेश झाला असून जागावाटपाचं गणित अद्याप निश्चित झालेलं नाही. मविआतील जागावाटप अंतिम टप्प्यात आलं असल्याची माहिती असून लोकसभेच्या ४८ जागांपैकी ३४ जागांचा तिढा जवळपास सुटला असल्याचे समजते. मात्र उर्वरित १४ जागा मविआतून कोणते पक्ष लढणार, याबाबत अजूनही रस्सीखेच सुरू आहे. ज्या १४ जागांवर अजूनही निर्णय झालेला नाही त्यामध्ये वर्धा, रामटेक, भिवंडी, हिंगोली, जालना, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि शिर्डी या जागांचा समावेश असल्याची माहिती आहे.