चांगल्याची सवय कशी संपली?

सरसंघचालक म्हणाले ते खरेच आहे. देशात वाईट गोष्टींची जितकी चर्चा होते तितकी चांगल्या गोष्टींची होत नाही, असे मत श्री. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. त्यांच्या या निरीक्षणाला बहुसंख्य समाज अनुमोदन देईल, कारण वस्तुस्थितीच तशी आहे. चांगले पहाण्याचा दृष्टीकोन कधीपासून कमी होऊ लागला याचे अवलोकन केले तर त्याची नैतिक जबाबदारी समाजधुरिणांपासून राजकीय नेत्यांपर्यंत, शिक्षकांपासून विविध व्यवसायातील प्रमुखांपर्यंत, पत्रकारांपासून संस्थाचालकांपर्यंत सर्वांना घ्यावी लागेल. समाजातील वाईटच बघण्याची काविळ सुरु होण्यामागे समाजातील विविध स्थरांवरील प्रदूषण कारणीभूत आहे असे म्हणावे लागेल. त्यात सर्वाधिक भरडल्या जाणाऱ्या जनतेचाही तितकाच दोष आहे हे नाकारुन चालणार नाही. गेल्या काही वर्षात समाजाच्या बिघडलेल्या मानसिकतेचे हे राष्ट्रीय द्योतक ठरले असून त्यात सुधारणा करण्याची गरज येऊन ठेपली आहे.
देशाभिमान, राष्ट्रीय एकात्मता, विकास, पर्यावरणाची काळजी, आर्थिक उत्कर्ष, या सर्व गुणांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचे संवर्धन होईल, असे वातावरण तयार करण्यात आपली व्यवस्था कमी पडली हे नाकारुन चालणार नाही. जाती-पातीच्या आणि गरीब-श्रीमंतांमधील भिंती वाढत गेल्या आणि त्यातून आपापसातील वाद आणि कृत्रिम स्पर्धा निर्माण झाली. त्यामुळे दुसऱ्याचे आणि समाजाचे भले बघण्याचा निकोप दृष्टीकोन लयास गेला. त्यातून सहिष्णुता आणि गुणग्राहकता ही भारतीय समाजाची पायाभूत गुणवैशिष्ट्ये लोप पावली. दुसऱ्याचे भले पहाण्याची वृत्ती नसल्यामुळे ते स्वीकारण्याचा मनाचा मोठेपणा नाहीसा झाला. तुझे ते माझे आणि माझ्यात कोणी वाटेकरी नसेल हा स्थायीभाव स्वार्थी वृत्तीतून झाला. त्यामागे संस्कारांचा ऱ्हास हे कारण दिले जात असले तरी समाजमनाला लागणाऱ्या स्थैर्यासाठी लागणारेे पोषक वातावरण आम्ही निर्माण करु शकलो नाही. समाजात जितकी दुही वाढेल ती पथ्यावर पडेल, या हेतूने राज्यकर्ते काम करु लागले. त्यांच्या शक्तीप्रदर्शनाला क्वचितच नैतिकतेचे अधिष्ठान असते. त्यात पाशवी अंहकार लपलेला असतो. याच अंहकारातून दुसऱ्याचे वाईट चिंतण्याचे कट-कारस्थान रचण्याचे षडयंत्र तयार करण्याचे काम अहोरात्र सुरु झाले. प्रामाणिक, सद्गुणी माणसे यापासून स्वत:ला अलिप्त ठेऊ लागली. आता तर अशी माणसे अल्पमतात आली आहेत. त्यांना जे चांगले वाटते ते बहुसंख्याकांना वाटत नाही आणि बहुसंख्याकांना आपल्या सोबत ठेवण्याचा मार्ग अनैतिकतेच्या वाटेनेच जात असल्यामुळे कायम नकारात्मक प्रतिक्रिया उमटत रहातात.
मणिपूरपासून राजस्थानपर्यंत आणि काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत जे काही चांगले घडत आहे ते या नकारात्मक शक्तींमुळे समाजाच्या दृष्टीआड रहात आहे. विशेष म्हणजे चांगल्यावरचा विश्वास उडाला आहे आणि जर काही चांगले घडतही असेेल तर त्याकडे संशयाने पहाण्याची मनोवृत्ती बळावली आहे. चांगले पहाण्याचा दृष्टीकोन त्यामुळेच हरवला आहे.