रोटरीच्या वतीने ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान

ठाणे : पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे ५ जानेवारी रोजी रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलने काही ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान केला.

प्रतिदिनी जनसामान्यांच्या दृष्टीने महत्वाच्या वेगवेगळ्या बातम्या त्यांच्यापर्यंत पोचवणे हे काम काळ, वेळ ध्यानात न घेता करणाऱ्या या लोकांप्रती असलेला विश्वास आणि प्रेमानिमित्त या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.

हा समारंभ रोटरी सेंटर, विष्णू नगर, नौपाडा, ठाणे येथे सकाळी १०.३० ते १.३० या वेळात झाला. ठाण्यातील काही रोटरी क्लब्सनी यात सक्रीय सहभाग घेतला. कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी घेणाऱ्या क्लबच्या माजी अध्यक्ष नेहा निंबाळकर यांनी सर्वांचे स्वागत केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे प्रांतपाल दिनेश मेहता तर विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक प्रशांत दीक्षित उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रशांत दीक्षित यांच्याशी ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ यांच्याशी गप्पा मारत विविध विषयांवर बोलते केले. हल्लीच्या पत्रकारांपुढील विविध आव्हाने, पत्रकारितेत विविध माध्यमांमुळे झालेले बदल, सर्व विषयांशी सातत्याने वाचनाने आणि मननाने संबंध ठेवणे अशा गोष्टी पत्रकारांसाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
दैनिक ‘ठाणेवैभव’ आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजर करत आहे. त्यानिमित्त संपादक मिलिंद बल्लाळ यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

रोटरी प्रांतपाल दिनेश मेहता यांनी रोटरी करत असलेल्या विविध समाजोपयोगी कामांची माहिती देताना पत्रकारांनी या गोष्टीची माहिती लोकांना द्यावी असे आवाहन केले. कार्यक्रम उत्तम झाल्याबद्दल त्यांनी नेहा निंबाळकर, माधवी डोळे यांचे कौतुक केले. रोटरी प्रांत सचिव निलेश लिखिते आणि अनील मुळ्ये यांचाही कार्यक्रमाच्या यशस्वितेत मोठा वाटा होता. रोटरी प्रांताचे अनेक पदाधिकारीही उपस्थित होते.
क्लबच्या अध्यक्ष स्वाती येरी यांनी सर्वांचे आभार मानले.