ठाणे : अग्निशमन दिनाच्या निमित्ताने शहरातील मोठी गृहसंकुले आणि आस्थापनांमध्ये ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने अग्निसुरक्षेचे धडे दिले जाणार आहेत.
आग लागल्यावर कोणत्या उपाय योजना कराव्यात यासंदर्भात प्रत्यक्षात प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार असून यामुळे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होईपर्यंत आगीची तीव्रता कमी करता येणार आहे. आठवडाभर हा जनजागृतीचा कार्यक्रम सुरु राहणार आहे. गेल्या वर्षभरात ठाण्यातील विविध भागात सरासरी ४५० पेक्षा अधिक आगीच्या घटना घडल्या असून यामध्ये होरायझन बिजनेस पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली होती. दरम्यान बचाव कार्य करताना शाहिद झालेल्या जवानांना रविवारी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे यांनी श्रद्धांजली वाहिली.
ठाण्यात शहरीकरण मोठ्या प्रमाणात झाले असून गेल्या दहा ते १२ वर्षात शेकडो गृहसंकुले आणि आस्थापनांची संख्या वाढली आहे. त्या तुलनेमध्ये अग्निसुरक्षेची यंत्रणा काही प्रमाणात तोकडी असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. अग्निशमन विभागात अद्यययावत उपकरणे असली तरी पुरेसे मन्युष्यबळ नसल्याने जवानांना बचावकार्य करताना तारेवरची कसरत करावी लागते.
ठाणे शहरात गेल्या वर्षभरात ८५० पेक्षा अधिक दुर्घटना घडल्या असून यापैकी सर्वाधिक ४५० पेक्षा अधिक घटना या आगीच्या आहेत. यामध्ये गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात लागलेली होरायझन बिजनेस पार्कला लागलेली आगी ही मोठी आगीची घटना होती. ही आग विझविण्यासाठी ठाणे महापालिकेला मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली व मीरा-भाईंदर या पाच महापालिकेची तसेच एअर फोर्सची मदत घ्यावी लागली होती. 23 कार्यालय, तीन कार व 23 दुचाकी या आगीत जाळून खाक झाल्या होत्या. सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती.
अनेक मोठ्य्या गृहसंकुलांमध्ये किंवा आस्थापनांमध्ये आग विझवण्याची यंत्रणा असूनही बऱ्याच वेळा या यंत्रणेचा वापर कसा करावा हे नागरिकांना माहिती नसते. परिणामी अग्निशमन येईपर्यंत आगीची तीव्रता वाढलेली असते. ही तीव्रता वाढू नये यासाठी शहरातील नागरिकांना त्यांची कर्तव्य आणि जबाबदारी यासंदर्भात पॉवर पॉईंटच्या आधारे माहिती दिली जाणार असून प्रात्यक्षिक देखील दाखवले जाणार आहे. सर्वात आधी अग्निशमन विभागाला माहिती देणे क्रमप्राप्त असले तरी त्यानंतर आपल्याकडील साधनांचा वापर कसा करायचा याचे धडे नागरिकांना आठवडाभर दिले जाणार असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांनी दिली आहे.
सुरक्षा यंत्रणाही तोकडीच
ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागात अजूनही २१२ पदे ही रिक्त असून ती अद्याप भरली गेलेली नाही. यामध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, केंद्र अधिकारी, सहाय्यक केंद्र अधिकारी, लिडिंग फायरमन, चालक/यंत्रचालक आणि फायरमन या सर्व पदांचा समावेश आहे.
रिक्त असलेली पदे
पद मंजूर भरलेली रिक्त
मुख्य अग्निशमन अधिकारी
१ ० ०
विभागीय अग्निशमन अधिकारी
१२ ० १२
केंद्र अधिकारी
२१ १५ ६
सहाय्यक केंद्र अधिकारी
५६ ६ ५०
लिडिंग फायरमन
७० ६३ ७
चालक/यंत्रचालक २२४ ३० १९४
फायरमन
४५० ९७ ३५३
एकूण
८३५ २१२ ६२३