रिक्षांना धडक देत टेम्पो पडला मेट्रोच्या खड्ड्यात

* टेम्पोचालक १५ वर्षांचा मुलगा
* अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी

ठाणे: रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घोडबंदर मार्गावरील आनंदनगर एका मिनी टेम्पोने उभ्या असलेल्या दोन रिक्षांना धडक दिली. त्यामुळे टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो मेट्रोसाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात कोसळला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे. विशेष म्हणजे टेम्पो चालवणारा चालक हा अवघा १५ वर्षांचा आहे.

रविवारी मध्यरात्री २.३५च्या सुमारास घोडबंदर येथील कांचनगंगा कॉम्प्लेक्ससमोर, सुरज वॉटर पार्कजवळ घोडबंदर रोडवरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला. महिंद्रा मिनी टेम्पोवर चालक असलेला १५ वर्षाचा अल्पवयीन चालक हा घोडबंदर रोडकडून मुंबईकडे जात होता. या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन रिक्षांना टेम्पो चालकाने मागून धडक दिली. त्यानंतर हा टेम्पो मेट्रो मार्गासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात जाऊन पडला.

एका रिक्षामध्ये असलेल्या जितेंद्र कांबळे (३१) नामक प्रवाशाचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांना उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुसऱ्या रिक्षात असलेले गणेश वाघमारे (२९) या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अपघात करणारा अल्पवयीन वाहन चालक हा वर्तकनगर परिसरात राहणारा असून त्याला आणि त्याच्या वडिलांना कासारवडवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.