आरोग्य विभागासह सर्व यंत्रणा सज्ज
मुरबाड: तालुक्यातील सुप्रसिद्ध म्हसोबा खांबलिंगेश्वर यात्रा सुरू झाली असून पोलिस, आरोग्य यंत्रणेसह अन्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
पौष पौर्णिमेला भरत असल्याने यात्रेकरुंच्या सुरक्षिततेसाठी पोलिस अधिक्षक डी.स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गिते यांनी सुमारे सहाशे पोलिस तैनात केले आहेत तर तालुका आरोग्य अधिकारी डॉ,श्रीधर बनसोडे व म्हसा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी होनराव पाटील यांनी देखील आरोग्य विभागाची तीन पथके तैनात केली आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या म्हसा यात्रेत विजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जबाबदार अधिकारी नसल्याने व्यापारी वर्गात आणि भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील म्हसा यात्रेला १५० ते २०० वर्षाची पंरपरा असून ती १३ जानेवारीपासून सुरू होत आहे. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे गुरांचा बाजार, आणि घोंगडी बाजार. शेतीची अवजारे व संसारोपयोगी वस्तू मिळत असल्याने इतर राज्यातून देखील, छोटे मोठे व्यापारी, यात्रेकरू आपली हजेरी लावतात. तेथे हजारो व्यापारी व्यवसाय करत असल्याने विजपुरवठा करण्यासाठी व व्यापाऱ्यांना मिटर पुरविण्यासाठी जबाबदार अधिकारी नसल्याने विजचोरीचे प्रमाण वाढणार आहे.
म्हसा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक शिवाजी टोहके यांनी २५ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे, त्यांच्यावर तीन ग्रामसेवक देखरेख करणार आहेत. १० शौचालये, रुग्णवाहिका, पुरेसा औषधसाठा, २४तास आरोग्य कक्ष ठेवण्यात आला आहे. पुरेसा टीसीएल साठा, धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी टँकरची सोय, पाणी शुध्दीकरण, कचरा, इत्यादी विषय त्या त्या विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या राज्यात नवीन आलेल्या एचएमपीव्ही विषाणूची भीती पसरली आहे, हा तितका भंयकर नसला तरी, येणाऱ्या यात्रेकरूंनी मास्क वापरणे, स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीधर बनसोडे यांनी केले आहे.