कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची पालघर जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती गेल्या आठवड्यात झाली होती. अखेर आठवडाभरानंतर हिंगोलीचे जिल्हाधिकार अभिनव गोयल यांची कडोंमपा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अभिनव गोयल हे २०१५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून ते मूळचे मेरठ येथील आहेत. यांचे आई-वडील हे डॉक्टर असून आजोबा हे भौतिक शास्त्राचे तर आजी रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका राहिल्या आहेत. आपल्या तिसऱ्या प्रयत्नात आयएएस परीक्षा ३६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गोयल यांनी कानपूर आयआयटीमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे.
२०१८ ला नांदेड येथे सहाय्यक जिल्हाधिकारी त्यानंतर लातूर जिल्हा परिषदेचे सीईओ, नंतर धुळ्याच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला. गेल्यावर्षी २९ ऑगस्ट २०२४ साली त्यांची हिंगोलीच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली होती. त्यांनी विविध जिल्ह्यात केलेल्या आपल्या चांगल्या कामाची छाप पाडली असून कल्याण-डोंबिवली महापालिकेतही ते असेच कार्यरत राहतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.