ठाणे : हिंदु समाजाचा हा मूक मोर्चा म्हणजे जागृती आणि एक इशारा आहे, असे सूचक वक्तव्य करून आमदार संजय केळकर यांनी बांग्लादेशात हिंदु समाजावर सुरू असलेल्या अत्याचाराचा निषेध केला.
सकल हिंदु समाज व तमाम हिंदु संघटनांच्यावतीने रविवारी ८ डिसेंबर रोजी सायंकाळी बांग्लादेश विरोधात ठाण्यात काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोर्चामध्ये एकवटलेल्या हजारो हिंदु बांधवांनी हाती भगवे ध्वज आणि बांग्लादेश विरोधातील फलक झळकवले.
ठाणे मनपा मुख्यालय कचराळी तलावासमोरुन प्रारंभ झालेल्या मूक मोर्चाचे जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी मैदान येथे विसर्जन झाले. यावेळी, नागरिकांनी भारतमातेच्या जयजयकारासह एक है तो सेफ है, बटोगे तो कटोगे आदी घोषणा देत सह्यांची मोहिम देखील राबवली.
माध्यमांशी बोलताना आ. केळकर यांनी, बांग्लादेशाच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये हा पहिलाच मोर्चा असल्याचे सांगितले. समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सनदशीर मार्गाने हा मूक मोर्चा काढला असून ही एकप्रकारे जागृती आणि इशारा आहे. तेव्हा, एक राहाल तरच सेफ राहाल, असे आवाहन उपस्थितांना केले. तर देश सुरक्षित ठेवायचा असेल तर अशाच प्रकारे आपल्याला एकजुटीने रहायला हवे, असे आवाहन आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी केले.
ठाण्यात निघालेल्या या भव्य मूक मोर्चामध्ये इस्कॉनचे ऊरूक्रमा गौरांग दास, आ.संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, नारायण पवार, संदीप लेले, सुनेश जोशी, जयेंद्र कोळी, विकास पाटील आदींसह हिंदु संघटनांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी मैदानात उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना मकरंद मुळे यांनी ज्वलंत संदेश देत स्फुल्लिंग चेतवले.
मूक मोर्चात झळकले मागण्यांचे फलक
बांग्लादेशातील मुस्लिम कट्टरतावाद्यांकडून हिंदू आणि अन्य अल्पसंख्यांक समुदायांवर गंभीर अत्याचार केले जात आहेत. मंदिरे, घरे, आणि दुकाने पेटवून दिली जात आहेत, हिंदू महिलांवर अमानवीय अत्याचार होत आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी. हिंदू समाजावर होणारे अत्याचार थांबवावे आणि इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्तता करावी. आदी मागण्या मूक मोर्चात फलकाद्वारे करण्यात आल्या.