ठाणे जिल्ह्याला चटके;
चार दिवस पारा थडथडणार
ठाणे: सोमवारी ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मुरबाड, बदलापूर आणि कल्याण शहरात पारा चाळीशीपार झाला होता. तर बहुतांश शहरातील तापमान ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले होते. अरबी समुद्रात दाब वाढल्याने उत्तरेकडून येणारे वारे रोखले गेले आहेत. परिणामी आणखी चार ते पाच दिवस तापमानात अशीच वाढ होणार असल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासकांनी दिली आहे.
तापमानात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे मार्च महिन्यात पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा अशा तीनही ऋतुंचा अनुभव आला. होता. मार्च महिन्याच्या सुरूवातीला धुळवडीने धावपळ उडवली होती. त्यानंतर तापमानात वाढ झाली. दुसऱ्या आठवड्यात १६ मार्च रोजी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर तापमानात घट पाहायला मिळाली होती. ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट नोंदवली जात असतानाच हिवाळ्याचा अनुभव येत होता. एप्रिल महिन्यात सुरूवातीला ढगाळ वातावरण होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.
बदलापुरातील खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सोमवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात 41.6 अंश सेल्सियस तापमानाची सोमवारी नोंद झाली. त्या खालोखाल बदलापूर शहरात सर्वााधिक 40.6 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. त्याखालोखाल कल्याण शहरात 40 तर डोंबिवली शहरात 39.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाल्याची माहिती अभिजीत मोडक यांनी दिली आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या उच्च दाबामुळे उत्तरेतील हवा येत असल्याने जिल्ह्यातील तापमानात वाढ नोंदवली जात असल्याची मााहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. येत्या 14 ते 15 एप्रिलपर्यंत अशाच प्रकारे तापमानात वाढ होत असल्याचे दिसून येईल. तसेच हा पारा 42 अंश सेल्सियपर्यंतही जाऊ शकतो अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
ठाण्यात पारा ४२ अंशावर!
मे महिन्यातील उकाडा ठाण्यातील नागरिकांनी आज अनुभवला. सकाळी तापमानात वाढ झाली होती. दुपारी तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने शरीराची लाही लाही झाल्याने वातानुकूलित यंत्रांचा वेग वाढला होता.
ठाण्यात आज सोमवारी दुपारी ४२.१ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. सकाळी ७ वाजता हे तापमान २७.८ अंश सेल्सिअस इतके होते. दुपारी तापमानात वाढ झाल्याने अनेकांनी घरात आणि कार्यालयात राहणे पसंत केले होते. रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ कमी झाली होती तर कार्यालयातील पंख्यांचा वेग वाढला होता. अनेक कार्यालयात वातानुकूलित यंत्र सुरू ठेवून अनेकांनी काम केले.
या महिन्यात तापमानात वाढ सुरू आहे. ५ एप्रिल रोजी दुपारी ३८.७., ६ एप्रिल रोजी ४१.२, ७ एप्रिल रोजी ३८.७, ८ एप्रिल रोजी ३९.८ आणि ९ एप्रिल रोजी ४१अंश सेल्सिअस इतके तापमान होते. या वर्षात सर्वात जास्त ४४ अंश सेल्सिअस इतके तापमान फेब्रुवारी महिन्यात झाले होते.