* शहरात सखल भाग जलमय
* भिंत कोसळली, झाडे पडली
* नालेसफाईवर प्रश्नचिन्ह
ठाणे : ठाण्यात बुधवार रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. आज शुक्रवारी दिवसभरात ६० मि. मी. हून जास्त पाऊस पडला. दरम्यान एक संरक्षक भिंतीसह सहा झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तर पुन्हा एकदा नाळेसफाईवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
बुधवारपासून ठाणे शहरात पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. तर गुरुवार आणि शुक्रवारी देखील पावसाने दमदार हजेरी हजेरी लावली आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. दुसरीकडे गटारांची सफाई योग्य पध्दतीने न झाल्याचे या पावसाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. ठाण्यातील वंदना सिनेमा, राम मारुती रोड, चंदनवाडी, तलावपाळी, बाजारपेठ, ठाणे महानगरपालिका रोड तसेच आग्रा रोड या ठिकाणी काही काळ पाणी साचलेले पाहायला मिळाले आहे. भूमिगत असलेले चेंबर भरून वाहत होते.
शहरात शुक्रवारी सायंकाळी ६.३० पर्यंत ६०.मि. मी.पेक्षा जास्त पाऊस पडला होता. सुदैवाने सुरु असलेल्या संततधार पावसामुळे कुठल्याही प्रकरची जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. दिवसभरात विविध ठिकाणी सहा वृक्ष पडल्याच्या तसेच फांद्या पडल्याच्या घटना घडल्या तर एके ठिकाणी संरक्षक भिंत पडल्याची घटना घडली आहे. ठाणे महापालिकेकडून नालेसफाई १०० टक्के झाल्याचा दावा करण्यात आला असतांना पावसाने पुन्हा एकदा हा दावा फोल ठरवल्याचे दिसून आले आहे.