* २० ठिकाणी झाडे कोसळली
* प्लास्टर पडून दोन व्यक्ती जखमी
ठाणे: मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळपासूनच दमदार हजेरी लावलेल्या पावसामुळे ठाण्याच्या बहुतांश सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. काही ठिकाणी तर गुडघ्यापर्यंत येईल इतके पाणी साचल्याने या पाण्यात अनेक वाहने बंद पडत असल्याचे पाहायला मिळाले. तर पादचाऱ्यांचेही चांगलेच हाल झाले.
पावसासोबत सोसाट्याचा वारा देखील असल्याने शहरात २० ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या असून एका ठिकाणी घरातील प्लास्टर कोसळून दोन व्यक्ती जखमी झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी ८.३० पासून सायंकाळी ६.३० पर्यंत ७५.९३ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत १९२२.९१ मिमी पाऊस पडला असून मागील वर्षी याच काळात १८९५.१३ मिमी पाऊस पडला होता.
गेले दोन ते तीन दिवस पावसाने चांगलीच हजेरी लावली असून मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळच्या वेळेत दमदार हजेरी लावल्यामुळे ठाणे स्थानक, गावदेवी, खारकर आळी, वंदना डेपो अशा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. बराच वेळ पाण्याचा निचरा न झाल्याने याचा सर्वाधिक फटका रिक्षाचालक आणि दुचाकीस्वरांना बसला. अनेक ठिकाणी रिक्षा साचलेल्या पाण्यामुळे रिक्षा बंद पडण्याचे प्रकारही घडले. तर दुचाकीस्वारांना देखील आपल्या बाईक पाण्यात धक्का मारत घेऊन जाव्या लागल्या. ठाणे महापालिकेकडून पावसाचे योग्य प्रकारे नियोजन झाल्याने नागरिकांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला.
दुसरीकडे पावसाच्या दमदार हजेरीसोबतच सोसाट्याचा वारा देखील असल्याने तब्बल २० ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या देखील पडल्या. काही ठिकाणी झाडे आणि झाडांच्या फांद्या या पार्किंग केलेल्या वाहनांवर पडल्यामुळे वाहनांचे नुकसान झाले मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
लोकमान्य नगर पाडा नं ३ या ठिकाणी असलेल्या तुळजाभवानी निवास या २० ते २२ वर्ष जुन्या असलेल्या तळ अधिक १ मजल्याच्या इमारतीच्या तळमजल्यावरील प्लास्टर हे पहाटे ४:५८ वाजताच्या सुमारास पडले. यामध्ये या ठिकाणी राहत असलेल्या सुनंदा वारंग (६३) यांच्या छातीला, पोटाला तसेच उजव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली.त्यांना सुरुवातीला उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालत दाखल करण्यात आले होते, त्यांना पुढील उपचाराकरिता सायन हॉस्पिटल हलवण्यात आले. तर याच घरातील दिनेश वारंग (३८) यांच्या
डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली.त्यांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून उपचार करून घरी पाठविण्यात आले.
ठाणे महापालिकेची केवळ बॅनरबाजी
ठाणे शहरात ज्या ठिकाणी सखल भागात पाणी साचते त्या ठिकाणी नागरिकांनी दक्षता बघण्याचे आवाहन करणारे फलक ठिकठिकाणी ठाणे महापालिकेच्या वतीने लावण्यात आले आहेत. साचलेल्या पाण्यातून जाण्यासाठी दोरखंडाची व्यवस्था करण्यात आली असल्याचा उल्लेख देखील बॅनरमध्ये करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात अशाप्रकारची कोणतीच सुविधा निर्माण करण्यात आली नसल्याचे वंदना डेपो येथील परिसरात दिसून आले. त्यामुळे ठाणे महापालिकेने केवळ बॅनरबाजीच केली कि काय असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे.