मुंबईसह ठाणे, पालघर आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

मुंबई : मुंबईसह ठाणे, पालघर आणि मध्य महाराष्ट्रात बुधवार आणि गुरुवार हे दोन्ही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यावेळी काही भागात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. तर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभगाने केले आहे.

दरम्यान, मुंबईसह राज्याच्या काही भागात पुढील काही दिवस पडणारा पाऊस हा वळिवाचा पाऊसच आहे. त्याला मोसमी पाऊस म्हणता येणार नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत बुधवारी चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होणार आहे. त्याचाच परिणाम म्हणून गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे आणि त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडणार आहे.
मुंबई, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर याचा प्रभाव राहील. त्यामुळे बुधवारपासून शनिवारपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या कालावधीत काही भागात वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी इतका राहील. तर, कही ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली,जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूरमध्ये गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशिममध्ये वादळी वारे, वीजांसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिवमध्ये वादळी वारे, वीजांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.