ठाणे: मागील दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने आज पुन्हा एकदा जोरदार फलंदाजी केली असून आत्तापर्यंत एक हजार मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे तर पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
ठाणे शहरात मागील महिन्यात २४ तारखेला पावसाची जोरदार सुरुवात झाली होती. आज सकाळपासूनच पावसाने बरसण्यास सुरवात केली होती. सकाळी ८.३० ते दुपारी २.३०च्या दरम्यान २३.८६ मिमी पावसाची नोंद झाली होती. आत्तापर्यंत १०२५.४६ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी १२१७.२० मिमी इतकी नोंद झाली होती. आज कॅसल मिल उड्डाणपूलावरील बॅरिगेटिंग पोलखाली उभ्या असलेल्या गाडीवर पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
शहरात पावसाने हजेरी लावली असली तरी कुठेही पाणी तुंबल्याची घटना घडली नाही. शहरात आणि महामार्गावर मात्र वाहतूक संथ गतीने सुरू होती. दरम्यान हवामान खात्याने उद्यापासून १७ जुलैपर्यंत ठाण्याला यलो अलर्ट जारी केला आहे. या दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.